Thursday, January 16, 2025
Homeआंतरराष्ट्रीयजेष्ठ अभिनेत्री मधुताई कांबीकर यांचा आज वाढदिवस … जाणून घ्या ह्या कलावंताची...

जेष्ठ अभिनेत्री मधुताई कांबीकर यांचा आज वाढदिवस … जाणून घ्या ह्या कलावंताची कहाणी

महाराष्ट्रातील सुप्रसिध्द जेष्ठ अभिनेत्री मधुताई कांबीकर यांनी मुख्यनायिका , लावणीसम्राज्ञी अशा विविध भूमिका अनेक चित्रपटात केलेल्या आहेत …

असा आहे त्यांचा जीवन प्रवास

जन्म माळेगाव खुर्द, ता. गेवराई, जि. बीड २८ जुलै १९५३ रोजी झाला,एका उपेक्षित समाजात त्यांचा जन्म झाला. आई – कलाबाई , मावशी – आयुबाई. मावशीनं मधुबाईंना दत्तक घेतलं. कांबी, ता. शेवगाव, जिल्हा अहमदनगर येथे त्यांचे बालपण गेले. त्यांचे शिक्षण इयत्ता सातवी पर्यंत कांबीत झाले. आई आणि मावशी लावणी कलावंत होत्या. त्यांचे दत्तक वडील रामभाऊ दौलतराव म्हस्के पाटील यांनी मधुबाईना कलेसाठी विशेष सहाय्य केले. बालपणापासून लावणी अदाकारी मधुबाईंच्या अंगात भिनलेली होती. त्या उजळ रंगाने आणि नाकी – डोळी, उपजतच सुंदरता असलेल्या मधुताईंच्या अंगभूत कलेची ओढ पाहून घरच्यांनी त्यांना शास्त्रोक्त नृत्य शिकवण्यासाठी पुण्यास पाठवले.

पुण्यात बाळासाहेब गोखले यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय नृत्याचे धडे घेतले. कथ्थकचं शिक्षण घेऊन त्या मुंबईत गेल्या. त्यांनी न्यू हनुमान थिएटर, लालबाग येथून १९७३ साली आपल्या कला जीवनाचा प्रारंभ केला. तो काळ लोकरंजनाचा होता. मधुबाईनी लोककलावंतांमध्ये राहूनच लावणी आणि अन्य लोकनृत्यांची परंपरा सांभाळली. लोकरंगभूमीचे कलाकौशल्य त्यांनी आत्मसात केले. लोककलेला त्या काळात जनमान्यता आणि राजमान्यताही होती. राज्य शासनाच्या सांस्कृतिक खात्यामार्फत पंचतारांकित हॉटेलांतून कलापथकांचे कार्यक्रम सादर झाले. त्यात लावणी अविष्कारासाठी मधुबाईंची निवड झाली. त्यांच्या सादरीकरणात विविधता असल्याने त्यांच्या नृत्याविष्काराची प्रशंसा झाली. नृत्यांगना म्हणून त्यांची ओळख त्या काळात संपूर्ण महाराष्ट्राला झाली .

१९७७ साली ‘ महाराष्ट्राची लोकधारा ‘ या कलापथकातून त्यांनी राजधानी दिल्लीत विलोभनीय नृत्यनाट्य सादर केले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या बरोबर खेळलेली फुगडी हा त्या वेळचा औत्सुक्याचा विषय ठरला. पुढे नगर रंगभूमीच्या कलावंत म्हणून त्या प्रकाश झोतात आल्या. त्या आधी अनेक लोकनाट्यातून त्या छोट्या – मोठ्या भूमिका करीत. गाढवाचं लग्न या वगनाट्यात त्यांनी वगसम्राट दादू इंदुरीकर यांच्याबरोबर भूमिका केली. चोरावर मोर या दूरदर्शन मालिकेतील त्यांची भूमिका लक्षवेधी ठरली. त्याकाळात तमाशापटांना लोकप्रियता मिळत होती. एक वेगळा चेहरा म्हणू प्रख्यात दिग्दर्शक अनंत मानेंनी लक्ष्मी चित्रपटासाठी मधुबाईंकडून सोलो नृत्य बसवून घेतले होते. त्याचवेळी सह्याद्री दूरदर्शनवर फुलोरा ,गजरा असे कार्यक्रम प्रदर्शित होत होते. त्यातील मधुबाईंच्या भूमिकांना उत्स्फूर्त दाद मिळत गेली. सहाजिकच मराठी चित्रपट निर्मात्यांनी त्यांच्याकडून छोट्या – मोठ्या भूमिका करवून घेतल्या. मराठी चित्रपटसृष्टीला कष्टाळू, समर्पक कलावंतांची मोठी देणगी लाभली आहे. मधू कांबीकर हे नाव या कलाकारांमध्ये अग्रक्रमानं घ्यावं लागते .

१९७८ सालात निळू फुलेंबरोबर सतीची पुण्याई , अशोक सराफांसह केलेला दगा , रंजना सारख्या कसलेल्या अभिनेत्रींबरोबरचा तमासगीर या त्यांनी केलेल्या भूमिका लक्षवेधी ठरल्या. मराठी चित्रपटातून काम करता – करता मधू कांबीकर अनेकविध लोकनाट्यातूनही भूमिका करीत होत्या. शंकर पाटील लिखित भानगडी शिवाय पुढारी नाही अशोकजी परांजपे निर्मित आतून कीर्तन वरून तमाशा , उदे गं अंबे उदे , वसंत सबनीसांचे विच्छा माझी पुरी करा , बाईचा चटका गमविला पटका असा जवळपास दहा लोकनाट्यातील त्यांच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या.


लोकरंगभूमीवरून कारकीर्द सुरु केलेल्या या अभिनेत्रीने लोकनाट्य, चित्रपट, दूरदर्शन, मालिकांबरोबरच अनेक नाटकातूनही अभिनय केला. त्यात प्रभाकर पणशीकरांबरोबर पुत्रकामेष्टी ; वि . वा . शिरवाडकर लिखित चंद्र जिथे उगवत नाही ; श्रीराम लागूंच्या समर्थ अभिनयाने साकारलेलं आकाश पेलतांना ; विक्रम गोखलेंसोबत पेईंग गेस्ट ; शं . ना . नवरे लिखित सूर राहू दे, लावणी भुलली अभंगाला ; शाहीर अमरशेख निर्मित आमचं नाव बाबुराव ; रा.रं.बोराडे लिखित आमदार सौभाग्यवती ; शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे निर्मित फुलवंती या शिवाय बेलभंडार आणि मधूप्रितम थिएटर्स या स्वनिर्मित सखी माझी लावणी अशा अनेकविध भूमिकांतून समर्थ अभिनेत्री म्हणून त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला.

त्यांना मिळालेले पुरस्कार : शापित चित्रपटाला सर्वोकृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार (१९८२), राज्य चित्रपट महोत्सव, राजाभाऊ परांजपे पुरस्कार, फ्लिमफेअर आशीर्वाद व कार्तिकी पुरस्कार ( खासगी ) ; हेच माझं माहेर चित्रपटाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार (१९८४), राघुमैना चित्रपटाला महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सव पुरस्कार (१९८५), एक होता विदूषक चित्रपटाला राज्य चित्रपट महोत्सव नामांकन (१९९१), मुक्ता चित्रपटाला कालनिर्णय पुरस्कार, सहाय्य्क अभिनेत्री महाराष्ट्र राज्य पुरस्कार (१९९४), कुलस्वामिनी तुळजाभवानी चित्रपटाला उत्कृष्ट सहाय्य्क अभिनेत्री राज्य चित्रपट महोत्सव पुरस्कार (२००१ ),संघर्ष जीवनाचा चित्रपटाला उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार, २६ वा राज्य महोत्सव (२००२), साद ( गुजराती) सर्वोकृष्ट अभिनेत्री, गुजरात राज्य चित्रपट पुरस्कार (२००२).

मधू कांबीकरांनी तब्बल चार दशके कलेची सेवा केली. कलेचा त्यांचा प्रवास हा लावणी, लोकनाट्य, चित्रपट, नाटक, दूरदर्शन मालिका पुन्हा लोकरंगमंच अशा विविध अंगानं बहरलेला राहिला. नागर रंगभूमी व ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या या अभिनेत्रींचे स्थान निश्चित वाखाणण्यायोग्य आहे. माना – सन्मानाचे पुरस्कार व प्रसिद्धी मिळूनही त्यांनी सखी माझी लावणी या कार्चेयक्रमाचे ‘ प्रयोग अमेरिका, अबुधाबी, दुबई, मॉरिशियस अशा देशात करून मराठी मनाच्या लावणीस बहुमान प्राप्त करून दिला. शब्दप्रधान लावणीनृत्य सादर करून शब्दांना अर्थवाही केले. पूरक मुद्राभिनय आणि आंगिक अभिनयानं फुलवण्याचे कसब मधू कांबीकरानी करून दाखवले.

पुण्याची मराठी रंगभूमी आणि गोपीनाथ सावरकर प्रतिष्ठान यांनी २७ नोव्हेंबर २०१६ रोजी माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरमध्ये आयोजित केलेल्या ‘लावण्य संगीत’ या कार्यक्रमात नृत्य सादर करत असताना मधू कांबीकर यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले होते तरीही त्यांनी त्या कार्यक्रमात भैरवीचे सादरीकरण केले. त्यानंतर मेकअप रूममध्ये गेल्यानंतर त्यांना पक्षाघाताचा सौम्य झटका आला त्यात त्यांचा उजवा हात बधीर झाला.त्यामुळे त्यांना रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल केले होते. या कार्यक्रमात त्या तब्बल १२ वर्षांनंतर नृत्य सादर करणार होत्या १२ वर्षांपूर्वी अशाच प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी नृत्य न करण्याचा निर्णय घेतला होता. २०१८ साली झी चित्र गौरव पुरस्कारावेळी मधू कांबीकर यांना मराठी सृष्टीतील भरीव योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यावेळी मधू कांबीकर यांची सून शीतल जाधव यांनी त्यांच्यावतीने हा पुरस्कार स्वीकारला होता. त्यावेळी शीतल जाधव यांनी आपल्याला अशी सासू मिळाली हे माझे भाग्य असल्याचे सांगितले होते. मधू कांबीकर आजारापणामुळे मुलगा प्रीतम आणि सून शीतल यांच्या बोलण्याला कुठलिही प्रतिक्रिया किंवा हालचाल करत नाहीत परंतु त्यांचे एक होता विदूषक, झपाटलेला, डेबू यासारखे चित्रपट जेव्हा घरात टीव्हीवर लावले जातात त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर कधी हसू तर कधी डोळ्यातून अश्रू वाहू लागतात…आपले संपूर्ण आयुष्य कला क्षेत्राला वाहिलेल्या या कलावंतिणीची अस्वस्थता सुनेच्या तोंडून ऐकल्यावर आपणही निःशब्द होऊन जातो…

संकलन : जान्हवी अविनाश कांबीकर

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments