Saturday, March 22, 2025
Homeताजी बातमीपिफ मध्ये होणार जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा 'पिफ डिस्टिंग्विश्ड अॅवॉर्ड' ने...

पिफ मध्ये होणार जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा ‘पिफ डिस्टिंग्विश्ड अॅवॉर्ड’ ने होणार सन्मान

पुणे फिल्म फाउंडेशन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १९ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाअंतर्गत अभिनेते अशोक सराफ यांचा भारतीय चित्रपट सृष्टीतील भरीव योगदानासाठी यावर्षीच्या ‘पिफ डिस्टिंग्विश्ड अॅवॉर्ड’ने सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती, पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष आणि महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी दिली. पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. पटेल बोलत होते.

पुणे फिल्म फाउंडेशनचे सचिव रवी गुप्ता,महोत्सवाचे कलात्मक संचालक समर नखाते, फाउंडेशन विश्वस्त सतीश आळेकर, एमआयटी स्कूल ऑफ फिल्म अॅण्ड टेलिव्हिजनचे संचालक अमित त्यागी, श्रीनिवासा संथानम आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

येत्या २ ते ९ डिसेंबर, २०२१ दरम्यान पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला असून, महोत्सवाचे उद्घाटन गुरुवार दि. २ डिसेंबर रोजी पुणे – सातारा रस्त्यावरील बिबवेवाडी येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहात सायंकाळी ५ वाजता होणार आहे. याच उद्घाटन कार्यक्रमात भारतीय चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दल अभिनेते अशोक सराफ यांना सन्मानित करण्यात येईल. महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, सांस्कृतिक कार्य संचलनालयाचे संचालक बिभीषण चवरे यावेळी उपस्थित असतील.

कोरोना काळात केलेल्या कामाबद्दल पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांचा विशेष सन्मान करण्यात येणार असल्याची माहितीही डॉ. पटेल यांनी दिली. उद्घाटन कार्यक्रमावेळी शास्त्रीय गायक राहुल देशपांडे, गायिका मधुरा दातार यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच एमआयटीच्या संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांचाही कार्यक्रम होणार आहे.

उद्घाटन कार्यक्रमानंतर सायं ७. ३० वाजता ‘द वुमन’ (देश – मंगोलिया) हा ओटगन्झोर बॅच्गुलुन दिग्दर्शित चित्रपट ‘ओपनिंग फिल्म’ म्हणून दाखविण्यात येईल. सदर चित्रपट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह आणि लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय)या दोन्ही ठिकाणी पाहता येणार आहे.

तर, सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉलमधील पीव्हीआर आयकॉन, कॅम्प परिसरातील आयनॉक्स व लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय फिल्म संग्रहालय (एनएफएआय) येथे यंदा महोत्सवातील चित्रपट दाखवले जाणार आहेत.

यावर्षीचे ‘पिफ डिस्टिंग्विश्ड अॅवॉर्ड’ विजेते अशोक सराफ यांनी आपल्या कसदार अभिनयाच्या जोरावर मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीत आपला स्वतंत्र ठसा उमटविला आहे. त्यांच्या विनोदी भूमिका आणि विनोद सादर करतानाचे टायमिंग यांनी रसिक प्रेक्षकांना खळखळून हसविले. १९६९ साली त्यांनी चित्रपट व छोट्या पडद्यावर पदार्पण करीत चित्रपट, मालिका व नाटक अशा तीनही माध्यमातून आपली कला सादर केली. आजवर त्यांनी २५० पेक्षा जास्त मराठी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. यामध्ये ‘एक डाव भुताचा’, ‘धूम धडाका’, ‘गम्मत जम्मत’, ‘अशी ही बनवाबनवी’ या मराठी चित्रपटांबरोबरच ‘करण-अर्जुन’, ‘येस बॉस’ आणि ‘सिंघम’ या चित्रपटांचा समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments