Sunday, August 16, 2026
Homeआंतरराष्ट्रीयइंग्लंडविरुद्ध दुसरी कसोटी आजपासून; दुखापतीमुळे शार्दुलची माघार

इंग्लंडविरुद्ध दुसरी कसोटी आजपासून; दुखापतीमुळे शार्दुलची माघार

१२ ऑगस्ट २०२१,
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत दिमाखदार कामगिरीनंतरही भारताच्या विजयाला पावसाने हुलकावणी दिली. त्यामुळे लॉर्ड्सवर गुरुवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात फलंदाजी अधिक बळकट करण्यासाठी दुखापतग्रस्त शार्दुल ठाकूरच्या जागी कर्णधार विराट कोहली आपला सर्वोत्तम फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनला संधी देण्याची दाट शक्यता आहे.

लंडनमध्ये कमाल तापमान २४ अंश सेल्सियस नोंदले गेले आहे, तर सरासरी तापमान १४ अंश सेल्सियस आहे. या परिस्थितीत इंग्लंडकडून हिरवीगार खेळपट्टी ठेवली जाण्याची शक्यता कमी आहे. २०१८ मध्ये अशाच प्रकारच्या खेळपट्टीवर भारताची फलंदाजी दोन दिवसांत दोनदा कोसळली होती. अष्टपैलू ख्रिस वोक्सने इंग्लंडच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

इंग्लंडचे २०९ धावांचे विजयासाठीचे आव्हान पेलण्यासाठी भारताने १ बाद ५२ अशी उत्तम सुरुवात केली. परंतु वरुणराजाने भारताच्या विजयावर विरजण टाकले. या सामन्यात भारताने पहिल्या २७८ धावा उभारल्या. परंतु कोहली (०), चेतेश्वर पुजारा (४) आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे (५) या महत्त्वाच्या कसोटी फलंदाजांनी निराशा केली. गेल्या दोन वर्षांत या तिघांकडून अपेक्षेनुसार कामगिरी झालेली नसल्याचे आकडेवारी सांगते. रहाणेला किमान मेलबर्नचे संस्मरणीय शतक तारते. के. एल. राहुलने दोन्ही डावांत अनुक्रमे ८४ आणि २६ धावा करताना सलामीच्या स्थानावरील दावेदारी भक्कम केली आहे. त्यामुळे दुखापतीतून सावरलेल्या मयांक अगरवालला संधी द्यायची झाल्यास भारत नेमकी कोणती रणनीती आखेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

संघ भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, मयांक अगरवाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमरा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, के. एल. राहुल, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), अभिमन्यू ईश्वरन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव.

संघ इंग्लंड : जो रूट (कर्णधार), जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, मोईन अली, रॉरी बर्न्‍स, जोस बटलर, जॅक क्रॉवली, सॅम करन, हसीब हमीद, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, डोम सिब्ली, मार्क वूड, साकिब महमूद.

वेळ : दुपारी ३.३० वा.

थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स, सोनी टेन ३ (हिंदी)

दोन्ही संघांना आर्थिक दंड आणि दोन गुण वजा

नॉटिंगहॅममधील पहिल्या कसोटी सामन्यात षटकांची गती धीमी राखल्याबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांना सामन्याच्या मानधनापैकी ४० टक्के दंड सुनावला आहे. याशिवाय ‘आयसीसी’ कसोटी अजिंक्यपदाच्या स्पध्रेत दोन्ही संघांचे प्रत्येकी दोन गुण वजा केले जाणार आहे. नियोजित वेळेत दोन्ही संघांनी दोन षटके कमी टाकल्याबद्दल ‘आयसीसी’ सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी हा दंड सुनावला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments