Friday, June 13, 2025
Homeआरोग्यविषयकपुण्यातील १ ली ते ८ वी पर्यंतच्या शाळा ३० जानेवारीपर्यंत बंद,पुण्यात उद्यापासून...

पुण्यातील १ ली ते ८ वी पर्यंतच्या शाळा ३० जानेवारीपर्यंत बंद,पुण्यात उद्यापासून ‘नो व्हॅक्सिन, नो एन्ट्री’ – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, ठाणे, नवी मुंबई पाठोपाठ आता पुण्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज कोरोनास्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी वरील निर्णय जाहीर केलाय. या निर्णयानुसार पुणे शहर आणि जिल्ह्यातील १ ली ते ८ वी पर्यंतच्या शाळा बंद राहणार आहेत. या वर्गांचे ऑनलाईन क्लास सुरु राहतील. तर ९ वी आणि १० वीचे वर्ग हे ऑफलाईन पद्धतीनेच सुरु राहतील असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलं आहे.

उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ आणि अन्य नेते, अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज पुण्यात कोरोना आढावा बैठक होत आहे. या बैठकीत पहिली ते आठवी पर्यंतची शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

कोरोनाची स्थिती बिकट होत आहे. पुणे जिल्ह्यात 74 टक्के लोकाचं लसीकरण झालं आहे. राहिलेल्या नागरिकांनी लवकर लस घ्यावी. लोकांना विनंती आहे की कठोर निर्णय लागू करण्यास भाग पाडू नका, असं आवाहन अजित पवार यांनी नागरिकांना केलंय. तसंच पुणे शहरात पॉझिटिव्हिटी रेट 18 टक्के झाला आहे. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. पुणे शहरात 3 हजार 950 सक्रीय रुग्ण आहेत. 15 ते 18 वयोगटातील मुलांचं 4 टक्के लसीकरण झालं आहे. पालक आणि विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं.

तसंच वेगवेगळ्या डिझाईनचे कापडी किंवा 2 प्लायचे सर्जिकल मास्क वापरू नका. N95 किंवा 3 प्लाय असलेल्या मास्कचाच वापर करा. पुण्यात उद्यापासून मास्क नसेल तर 500 रुपये दंड आकारला जाणार आहे. तर मास्क नसताना थुंकल्यावर 1 हजार रुपये दंड आकारला जाईल. त्याचबरोबर उद्यापासून पुणे जिल्ह्यात सर्वत्र मॉल, खासगी तसंच सरकारी कार्यालयात कोरोना लसीचे दोन्ही डोस झाले नसतील तर प्रवेश मिळणार नाही. नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस खात्याला सक्त सूचना दिल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.

राज्यातही गेल्या आठवडाभरात कोरोना रुग्णसंख्या झपाट्यानं वाढतेय. सहा दिवसांपूर्वी असलेल्या रुग्णवाढीच्या तुलनेत काल रुग्णसंख्या तब्बल सहापटीनं वाढलीय. कोरोनाचा हा विस्फोट होत असताना राज्यात आणखी कठोर निर्बंध लागण्याची शक्यता वर्तवली जातेय. कॉलेज बंद करायची की नाहीत याबाबत दोन दिवसांत निर्णय घेऊ, असं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments