पुणे, ता.१० : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पदविका अभ्यासक्रमांची सत्र परीक्षा ऑनलाइन आणि प्रॉक्टर्ड पद्धतीने शनिवारी (१० एप्रिल) सुरू होत आहे. पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील सुमारे सहा लाख विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.
राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विद्यापीठाने पहिल्या सत्राची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. त्यात नियमित, विषय राहिलेले विद्यार्थी (बॅकलॉग) आदींचा समावेश आहे. स्मार्टफोन, लॅपटॉप, संगणक, टॅब्लेट अशा साधनांद्वारे विद्यार्थ्यांना घरबसल्या परीक्षा देता येईल. परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी प्रॉक्टर्ड पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. विद्यापीठाचीच एसपीपीयू एज्युटेक फाउंडेशन ही कंपनी पहिल्यांदाच ऑनलाइन परीक्षा घेणार आहे. परीक्षेसाठी खासगी माहिती तंत्रज्ञान कंपनीचे सहकार्य घेण्यात आले आहे.
सुमारे चाळीस ते पंचेचाळीस दिवस ही परीक्षा चालणार आहे. रोज ८० हजार ते एक लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. एक विद्यार्थी किमान पाच ते सहा विषयांची परीक्षा देणार आहे. त्यामुळे कोणतीही तांत्रिक अडचण येऊ न देता परीक्षा पार पाडण्याचे विद्यापीठ प्रशासनासमोर आव्हान आहे, अशी माहिती विद्यापीठाने दिली आहे.
परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये गुण दिले जाणार आहे तसेच, त्याबाबतीत प्रणालीद्वारे नोंदवलेल्या तक्रारींचीच दखल घेतली जाणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना यूजरनेम आणि पासवर्ड देण्याची व्यवस्था विद्यापीठाने केली आहे.
परीक्षा सुरळीत होण्यासाठी परीक्षा व मूल्यमापन मंडळात वॉर रूम तयार करण्यात आली आहे. या वॉर रूममध्ये सुमारे ७५ कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. तसेच विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी यांना डॅशबोर्डच्या माध्यमातून ऑनलाइन परीक्षेची स्थिती पाहता येईल. विद्यार्थी त्यांच्या समस्या चॅटबॉक्सद्वारे मांडू शकतील. तसेच, दूरध्वनी मदत केंद्र (कॉल सेंटर) कार्यान्वित करण्यात आले आहे. कोणतीही अडचण आल्यास विद्याथ्र्यांनी ०२०-७१५३०२०२ या क्रमांकावर संपर्क साधावा, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली.