२५ जानेवारी २०२१,
केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांविरुद्ध गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन सुरू आहे. आपल्या मागण्यांवर ठाम राहत शेतकरी कडाक्याच्या थंडीतही ठाण मांडून बसलेले आहेत. या शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला असून मुंबईत महामुक्काम सत्याग्रह सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी राज्यातील जवळपास २१ जिल्ह्यांतून हजारो शेतकरी मुंबईतील आझाद मैदानात एकवटू लागले आहेत. या आंदोलनात उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सहभागी होणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेसुद्धा शेतकऱ्यांशी संवाद साधण्याची शक्यता आहे.
संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा या झेंड्याखाली या आंदोलनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी, कामगार मुंबईतील आझाद मैदान येथे जमायला सुरुवात झाली आहे. नाशिक येथून अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात सहभागी होण्यासाठी सुमारे १५ हजार शेतकरी मार्गस्थ झाले होते. हे शेतकरी काही वेळापूर्वीच आझाद मैदानात दाखल झाले आहेत. त्यामुळे हा परिसर शेतकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेला आहे.
आझाद मैदानात शेतकऱ्यांचे हे तीन दिवसांचे धरणे आंदोलन असणार आहे. या आंदोलनाला राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीचाही पाठिंबा असून आंदोलन शांततेत पार पाडण्यासाठी सर्वतोपरी खबरदारी घेण्यात येत आहे. आझाद मैदानात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून शेतकऱ्यांना कोणतीही आडकाठी येणार नाही, अशी काळजी घेण्यात येत आहे. आझाद मैदानात भव्य असा मंडपही उभारण्यात आला आहे. या आंदोलनादरम्यान राजभवनावर मोर्चाने जाऊन शेतकरी प्रतिनिधी मागण्यांचे निवेदनही राज्यपालांना देणार आहेत. २६ जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनी आझाद मैदानात ध्वजारोहणही केलं जाणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या मोर्चाबाबत एक ट्वीट करण्यात आले आहे. त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या मोर्चाला उद्या (२५ जानेवारी) संबोधित करणार आहेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री व शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे सुद्धा मोर्चात सहभागी होतील व मोर्चाला मार्गदर्शन करतील, असे सांगण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मोर्चेकऱ्यांशी संवाद साधणार, असे सांगितले जात असले तरी ते नेमके केव्हा आझाद मैदानात येणार हे मात्र अद्याप अधिकृतरित्या सांगण्यात आलेले नाही.