Tuesday, February 27, 2024
Homeमुख्यबातम्या‘ससून’चा कारभार अधांतरी! नवीन अधिष्ठात्यांच्या नियुक्तीचा आदेशच नाही

‘ससून’चा कारभार अधांतरी! नवीन अधिष्ठात्यांच्या नियुक्तीचा आदेशच नाही

डॉ. काळे हे अधिष्ठातापदाचा कार्यभार स्वीकारून लगेचच रजेवर गेले. मात्र, तब्बल ११ दिवसांनंतरही डॉ. काळे यांच्या नियुक्तीचा आदेश न निघाल्याने ससूनचा कारभार अधांतरी सुरू आहे.

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदावरून डॉ. संजीव ठाकूर यांना राज्य सरकारने पदमुक्त केले होते. त्याच दिवशी उच्च न्यायालयानेही डॉ. ठाकूर यांची नियुक्ती रद्द करून आधीचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांच्या पुनर्नियुक्तीचे आदेश दिले होते. त्यानंतर डॉ. काळे हे अधिष्ठातापदाचा कार्यभार स्वीकारून लगेचच रजेवर गेले. मात्र, तब्बल ११ दिवसांनंतरही डॉ. काळे यांच्या नियुक्तीचा आदेश न निघाल्याने ससूनचा कारभार अधांतरी सुरू आहे.

ससूनच्या अधिष्ठातापदावरून त्यांची बदली करण्याचा आधीचा आदेश उच्च न्यायालयाने १० नोव्हेंबरला रद्द केला होता. त्याचदिवशी अमली पदार्थ तस्करीचा सूत्रधार ललित पाटील पलायन प्रकरणात तत्कालीन अधिष्ठाता डॉ. ठाकूर दोषी आढळले. राज्य सरकारने डॉ. ठाकूर यांना पदमुक्त केले तर अस्थिव्यंगोपचार विभागातील पथकप्रमुख डॉ. प्रवीण देवकाते यांना निलंबित केले. त्यामुळे अधिष्ठातापद रिक्त झाल्याने डॉ. काळे यांनी तातडीने ११ नोव्हेंबरला या पदाचा कार्यभार स्वीकारला.

डॉ. काळे हे कार्यभार स्वीकारल्यानंतर लगेचच रजेवर गेले. त्यानंतर अद्याप ११ दिवसांनंतरही त्यांच्या नियुक्तीचा आदेश निघालेला नाही. सध्या ससूनच्या अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. शेखर प्रधान यांच्याकडे आहे. विशेष म्हणजे सेवा ज्येष्ठतेनुसार डॉ. श्रीनिवास शिंत्रे यांच्याकडे हा अतिरिक्त कार्यभार सोपविणे आवश्यक होते. मात्र, ते रजेवर असल्याने डॉ. प्रधान यांच्याकडे ही जबाबदारी आली आहे. त्यामुळे अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कार्यभार कोणीच स्वीकारण्यास तयार नसल्याची चर्चा ससूनमध्ये रंगली आहे.

डॉ. विनायक काळे यांची ससूनच्या अधिष्ठातापदी नियुक्ती करण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांकडून निघणे अपेक्षित आहे. याबाबतचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाने पाठविला आहे. त्यावर लवकरच कार्यवाही होणार आहे. तत्कालीन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांची पदमुक्ती आणि डॉ. प्रवीण देवकाते यांच्या निलंबनाचा आदेश त्याचवेळी तातडीने काढण्यात आला होता. – प्रवीण वाघमारे, सचिव, वैद्यकीय शिक्षण विभाग

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मी ससूनच्या अधिष्ठातापदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर मी रजेवर गेलो. राज्य सरकारकडून माझ्या नियुक्तीचा आदेश अद्याप निघालेला नाही. हा आदेश निघाल्यानंतर मी तातडीने रुजू होईन. – डॉ. विनायक काळे, अधिष्ठाता, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून रुग्णालय

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments