Saturday, December 7, 2024
Homeताजी बातमीसंजोग वाघेरे पाटील मंगळवारी दाखल करणार उमेदवारी अर्ज महाविकास आघाडीचे प्रमुख नेते...

संजोग वाघेरे पाटील मंगळवारी दाखल करणार उमेदवारी अर्ज महाविकास आघाडीचे प्रमुख नेते राहणार उपस्थित

मावळ लोकसभेचे प्रचार प्रमुख योगेश बाबर यांची माहिती

पिंपरी, (प्रतिनिधी) :- मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमदेवार संजोग वाघेरे पाटील यांचा उमेदवारी अर्ज मंगळवार, दि‌.23 एप्रिल 2024 रोजी दाखल करण्यात येणार आहे. वाघेरे पाटील यांचा अर्ज दाखल करण्यासाठी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मावळ लोकसभा मतदार संघाचे प्रचार प्रमुख योगेश बाबर यांनी दिली.

अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेचे प्रमुख तथा माजी पर्यटनमंत्री आमदार आदित्य ठाकरे, काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे, शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार, शेतकरी कामगार पक्षाचे नेते तथा आमदार जयंत पाटील, शिवसेना उपनेते तथा आमदार सचिन अहिर आदी प्रमुख नेत्यांसह महाविकास आघाडीतील (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शेतकरी कामगार पक्ष, तसेच इतर सर्व पक्ष, संघटना यांचे पदाधिकारी‌ व‌ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

पिंपरीगाव येथून सकाळी ९.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून उमदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रॅलीला सुरुवात होईल. पुढे पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, शगून चौक, काळेवाडी, चिंचवडगाव महासाधू मोरया गोसावी मंदिर, क्रांतीवीर चापेकर बंधू स्मारक, चिंचवड स्टेशन मार्गे आकुर्डी येथील खंडोबा मंदिर येथे रॅली पोहोचणार आहे. खंडोबा माळ येथून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पदयात्रा सुरू होऊन म्हाळसाकांत चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक मार्गे पदयात्रेचा आकुर्डी रेल्वे स्टेशन येथे समारोप होईल. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात अर्ज दाखल केल्यानंतर जाहीर सभेत महाविकास आघाडीचे नेते उपस्थितांना संबोधित करणार आहेत, असे बाबर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments