२१ सप्टेंबर २०२१,
भाजपा नेते किरीट सोमय्या आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यामधील वादानंतर शिवसेनेने अग्रलेख लिहीत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. त्या अग्रलेखाला प्रत्युत्तर देत पाटलांनी संजय राऊतांना पत्र पाठवलं. त्या पत्रावर खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया आली आहे. चंद्रकांत पाटलांनी आमच्या एका अग्रलेखावर पत्र पाठवलं. आम्ही त्यांच्यावर टीका केली. त्याच प्रमाणे त्यांना आमच्यावर टीका करण्याचं स्वातंत्र्य आहे. आम्ही फ्रिडम ऑफ स्पीच मानतो आणि म्हणूनच त्यांचं पत्र आजच्या सामनात छापलं. जेणेकरून पाटलांची विषारी भाषा महाराष्ट्रातील जनतेला कळेल, असं राऊत एबीपी माझाशी बोलताना म्हणाले.
“पीएमसी बँक घोटाळ्याबाबत पाटील जे काही बोललेत, त्यांनी जे आरोप केलेत ते मला मान्य नाही. आम्ही असले फालतू धंदे करत नाहीत. असे घोटाळे केले असते तर मी इतक्या वर्षात राजकारणात राहिलो नसतो. पाटलांनी जे म्हटलंय त्या संदर्भात त्यांना पुढच्या चार दिवसांत कायदेशीर नोटीस पाठवण्यात येईल आणि त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार आहे. मात्र मी इतरांप्रमाणे कोट्यवधी रुपयांचा दावा ठोकणार नाही. मी पाटलांवर केवळ सव्वा रुपयाचा दावा ठोकणार आहे. कारण पाटलांची लायकी कोट्यवधी रुपयांची नाही. त्यांची किंमतच केवळ सव्वा रुपया आहे,” अशी टीका राऊत यांनी केली. तसेच “भाजपाच्या नेत्यांच्या तोंडाची गटारं झाली असून ते तोंडात येईल ते बोलतात. देशात न्यायालयं नाहीत का, फक्त ईडीचीच कारवाई का होते. भाजपाच्या लोकांनी ईडीसारख्या संस्थांना बदनाम केलंय. ईडीचे यांच्या घरी भांडी घासायला येते का,” असा सवालही राऊतांनी केला.
काय म्हणाले होते पाटील..
“मला ईडीचा अनुभव नाही. तो येण्यासाठी भरपूर काळा पैसा असावा लागतो. आर्थिक गैरव्यवहार केले की, ईडीचा अनुभव येतो. तुमच्या पत्नीला पीएमसी बँक घोटाळ्यातून निघालेले पन्नास लाख रुपये मिळाले आणि या बेहिशेबी प्राप्तीबद्दल चौकशीसाठी ईडीने नोटीस बजावल्यानंतर तुम्ही हैराण झाला होता. अखेर बरीच धावपळ करून, ते पैसे परत देऊन प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न तुम्ही धापा टाकत केलात. हे सर्व पाहिल्यावरून मी अंदाज बांधला की पन्नास लाखांसाठी एवढा त्रास होत असेल तर १२७ कोटींसाठी नक्कीच फेस येणार,” असं पाटलांनी म्हटलंय.”