रावेत येथील संत तुकाराम महाराज पूल ते मुकाई चौकापर्यंतच्या रस्त्याच्या कडेला पदपथ व सायकल ट्रॅक करण्याच्या तसेच पिंपळे सौदागर येथे गिर्यारोहणासाठी क्लायबिंग वॉल बांधण्यासाठी येणा-या खर्चाच्या विषयाला प्रशासक शेखर सिंह यांनी आज मंजुरी दिली.
पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये प्रशासक शेखर सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बैठक संपन्न झाली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते. महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विकास विषयक कामांच्या सुमारे ४६ कोटी ११ लाख रुपये खर्चाच्या मंजुरीचे विषय आज प्रशासक सिंह यांच्या समोर मान्यतेसाठी ठेवण्यात आले होते. या विषयांना त्यांनी मंजुरी दिली.
रावेत येथील संत तुकाराम महाराज पूल ते मुकाई चौकापर्यंतच्या रस्त्याच्या कडेला पदपथ व सायकल ट्रॅक करण्यात येणार आहेत. याकामी १३ कोटी ९ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच पिंपळे सौदागर येथे गिर्यारोहणासाठी क्लायबिंग वॉल बांधण्यासाठी येणा-या ४ कोटी ४३ लाख रुपये खर्चाच्या विषयास मंजुरी देण्यात आली. बीआरटी कॉरीडॉर ४ वरील बस स्टॉप पेंटिंग, कॉरीडॉर दुरुस्ती,फुटपाथ दुरुस्ती तसेच इतर स्थापत्य विषयक कामे करण्यात येणार आहे. याकामी १ कोटी ७ लाख रुपये खर्च होणार आहेत. बीआरटी कॉरीडॉर ४ वरील खोदलेल्या चरांची दुरुस्ती करणे तसेच इतर अनुषंगिक स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी येणाऱ्या १ कोटी ६ लाख रुपये खर्चासह तरतूद वर्गीकरणाच्या विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी आज मान्यता दिली.