नव्याने सुरू झालेल्या मेट्रो मार्गिकांवरील दोन स्थानकांचा सुकाणू महिलांच्या हाती आहे. त्यामध्ये एकसर व आकुर्ली या स्थानकांचा समावेश आहे. येथे तिन्ही पाळ्यांमध्ये महिला कर्मचारीच संपूर्ण स्थानक हाताळतात. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ही बाब महत्त्वाची ठरते.
मेट्रो ७ ही मार्गिका गुंदवली (अंधेरी) ते आनंदनगर (दहिसर पूर्व) आहे. तर मेट्रो २ अ ही मार्गिका अंधेरी पश्चिम ते दहिसर पूर्व, अशी आहे. ही मार्गिका २० जानेवारीला पूर्ण स्वरूपात सुरू झाली. यापैकी आकुर्ली मेट्रो ७ व एकसर हे मेट्रो २ अ वरील स्थानक आहे. याच दोन स्थानकांचा सुकाणू हा महिलांच्या हाती आहे. याद्वारे मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) महिला सबलीकरणाकडे पाऊल उचलले आहे.
स्थानक व्यवस्थापकापासून सुरक्षारक्षक कर्मचाऱ्यांपर्यंत ७६ महिला कर्मचाऱ्यांमार्फत या दोन मेट्रो स्थानकांचे परिचालन आणि व्यवस्थापन केले जात आहे. परिवहन क्षेत्रातील महिलांचे योगदान अधोरेखित करून कामाच्या ठिकाणी प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या दोन्ही स्थानकांवरील सर्व महिला कर्मचारी तीन शिफ्टमध्ये कार्यरत आहेत. स्थानक नियंत्रक, ओव्हर एक्साइज, तिकीट विक्री अधिकारी, शिफ्ट पर्यवेक्षक, ग्राहक सेवा अधिकारी आदी विभागांतील अधिकारी व कर्मचारी मेट्रो प्रवाशांना मदत करीत आहेत. तर सुरक्षा आणि सफाई कर्मचारी मेट्रो स्थानकांवरील सुरक्षितता आणि स्वच्छ वातावरण सुनिश्चित करतात. मेट्रोमधील महिला कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यात आले आहे. तसेच महिला प्रवाशांसाठी स्वतंत्र मेट्रोचे डबे, स्वतंत्र प्रसाधन गृह आणि १८०० ८८९ ०८०८ हा टोल फ्री मदत क्रमांक पुरविण्यात आला आहे. मेट्रोच्या परिचालनासाठी सुमारे २७ टक्के म्हणजे ९५८ महिला कर्मचाऱ्यांचा समावेश असून त्या देखभाल आणि दुरुस्ती, एचआर, वित्त आणि प्रशासन या विभागांत कार्यरत आहेत. बरेचसे कर्मचारी हे बाह्यसेवेमार्फत घेण्यात आले आहेत.