साहित्य अकादमीकडून आज विविध पुरस्कारांची घोषणा केली आहे. साहित्य अकादमी कडून देशातील २४ भाषांमध्ये लेखन करणाऱ्या लेखकांचा पुरस्कार देऊन गौरव केला जातो. यंदाचा मराठी भाषेतील साहित्य अकादमीचा पुरस्कार कोल्हापुरातील कृष्णात खोत यांच्या रिंगाण या कादंबरीला जाहीर झाला आहे. देशातील २४ भाषेत प्रत्येकी एक पुरस्कार जाहीर केला जातो. या पुरस्कारासोबत १ लाख रुपये देखील दिले जातात. या पुरस्काराचं वितरण १२ मार्च रोजी करण्यात येणार आहे.
कृष्णात खोत यांनी रिंगाण या कादंबरीत मध्ये विस्थापितांच्या जगण्याचं चित्रण केलं आहे. रिंगाण ही कादंबरी २०१८ मध्ये प्रकाशित झाली होती. कृष्णात खोत यांच्या यापूर्वी ‘गावठाण’ (२००५), ‘रौंदाळा’ (२००८), ‘झड-झिंबड’ (२०१२), ‘धूळमाती’ (२०१४) कादंबऱ्या प्रकाशित झालेल्या आहेत. तर, ‘नांगरल्याविन भुई’ (२०१७) हा व्यक्तिचित्रणांचा संग्रह प्रसिद्ध आहे. याशिवाय त्यांनी काही कथाही लिहिल्या आहेत.
साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर होताच कृष्णात खोत म्हणतात..
कृष्णात खोत यांच्याशी पुरस्कार जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्र टाइम्सनं संवाद साधला असता ते म्हणाले की पर्यावरणाबरोबर चाललेल्या मानवाच्या युद्धात मानवाचा पराभव अटळ आहे. विस्थापितांच्या आवाजची नोंद रिंगाण या कादंबरीच्या माध्यमातून घेण्यात आली आहे. या पुरस्कारामुळं भारतीय पातळीवरचा एक साहित्यिक म्हणून ओळख झाली. शेसव्वाशे घरांच्या निकमवाडी सारख्या वाडीतून देशाच्या राजधानीत आपल्या लेखणीची नाममुद्रा उमटवणारा लेखक या पुरस्कारामुळं होता आलंय.
मराठीतील अव्वल दर्जाची कादंबरी म्हणून दिल्या जाणाऱ्या देशपातळीवरच्या साहित्य अकादमी सन्मानाने कृष्णात खोत यांच्या रिंगाण या कादंबरीचा गौरव करण्यात आला आहे. यासंदर्भात ते म्हणाले की, जबाबदारीने लिहिणाऱ्यांनाच नव्हे तर जबाबदारीने कोणतंही सर्जनशील काम करणाऱ्यांचा सन्मान होणे हे फक्त त्याच्याच नाही तर समाजाच्याच आरोग्याच्या दृष्टीने हितकारक असते. कृष्णात खोत यांना यापूर्वी त्यांच्या लेखनाबद्दल महाराष्ट्र फाऊंडेशनकडून देखील पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.