६ एप्रिल २०२१,
कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात दिवसागणिक वाढत चाललाय. कोरोना संकटातच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात हृदयद्रावक घटना घडलीय. दोन जुळ्या बाळांना जन्म देऊन ३६ वर्षीय आईला कोरोना मृत्यू घेतल्यानं सगळीकडूनच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ३६ वर्षीय महिलेला ४ एप्रिलला प्रसूतीचा त्रास जाणवू लागला म्हणून ती महिला पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली आणि महिलेची तपासणी करण्यात आली, त्यावेळी दुर्दैवाने ह्या महिलेच्या शरीरामधील ऑक्सिजनची पातळी खालावलेली होती. रुग्णालयातील डॉक्टरानी तात्काळ त्या महिलेची कोरोना चाचणी केली, त्या चाचणीमध्ये ती महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली.
दुसऱ्या दिवशी 5 एप्रिलला ह्या महिलेची सिझरद्वारे प्रसूती झाली आणि तिने दोन जुळ्या गोंडस मुलींना जन्म दिला. परंतु प्रसूती झाल्यानंतर त्या आईची प्रकृती ढासळत गेली आणि 24 तासांच्या आतच या दोन गोंडस जुळ्या मुलींच्या मायेचे छत्र हरपले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.तर दुसरीकडे ह्या दोन्ही बाळांची कोरोना अँटीजेन चाचणी निगेटिव्ह आली. आरटीपीसीआर अहवाल मात्र प्रतीक्षेत आहे. केवळ हीच गरोदर महिला चिंताजनक अवस्थेमध्ये होती, असं नव्हे तर महापालिकेच्या रुग्णालयात सध्या २० कोरोनाबाधित गरोदर महिलांवर उपचार सुरू आहेत,
कोरोनाचा हा नवा स्ट्रेन गरोदर महिलांसाठी घातक…
त्यापैकी पाच महिला आयसीयूमध्ये दाखल आहेत. त्यामुळे कोरोनाचा हा नवा स्ट्रेन गरोदर महिलांसाठी घातक ठरत असल्याचे वायसीएमचे डॉक्टर विनायक पाटील यांनी नमूद केले. त्यामुळे गरोदर महिलांनी घरी असताना देखील त्यांच्या शरीरात जाणवणाऱ्या बदलाबाबत डॉक्टरांशी सल्ला-मसलत करून त्यावरती उपचार घ्यावेत अथवा तातडीने कोरोनाची चाचणी करावी, असेही डॉक्टर पाटील यांनी आवाहन केले आहे.