पिंपरी पालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी भाजपला जाणीवपूर्वक आणि सतत अडचणीत आणण्याचा विडाच उचलला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर शक्य त्या मार्गाने आयुक्तांकडून भाजपची अडवणूक सुरू आहे. पालकमंत्र्यांकडून आयुक्तांना तशी सुपारीच देण्यात आली आहे, असा आरोप महापौर माई ढोरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना केला. याविषयी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास आयुक्तांनी स्पष्ट नकार दिला.
गेल्या काही दिवसांपासून आयुक्त पाटील आणि सत्ताधारी भाजप पदाधिकारी यांच्यात सुप्त संघर्ष सुरू होता. बुधवारी त्याचा उद्रेक झाल्याचे दिसून आले. महापौर ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी तातडीची पत्रकार परिषद घेत आयुक्तांच्या कार्यपध्दतीवर आक्षेप घेत त्यांच्यावर गंभीर आरोप केले.
पिंपरी पालिकेत भाजपची सत्ता आहे. शहरवासीयांसाठी आवश्यक, उपयुक्त असे निर्णय आम्ही घेतो. मात्र, आयुक्त आडकाठी आणतात. अडवा आणि जिरवा अशा धाटणीचे त्यांचे काम सुरू आहे. आयुक्त परस्पर निर्णय घेतात. सत्ताधाऱ्यांच्या निर्णयांची अंमलबजावणी होऊ देत नाहीत. पालिका सभेत मंजूर झालेल्या विषयांना सरळसरळ केराची टोपली दाखवतात. आमच्या नगरसेवकांची कामे होऊ देत नाहीत. आयुक्त या शहराचे तथा महापालिकेचे मालक नाहीत, हे त्यांनी लक्षात घ्यावे. चांगले सनदी अधिकारी म्हणून त्यांच्याकडे आम्ही पाहत होतो. मात्र, त्यांची सध्याची कार्यपध्दती पाहता ते पालकमंत्र्यांच्या आदेशानुसारच काम करत आहेत. त्यांनी राजकीय पक्षासाठी काम करणे थांबवून शहरवासीयांच्या हितासाठी काम करावे. आयुक्त शहरात आल्यापासून कामांचा वेग मंदावला आहे. आयुक्त जाणीवपूर्वक कामच करत नसल्याने त्यांचा निषेध करत असल्याचे महापौर व पक्षनेत्यांनी स्पष्ट केले.
आयुक्तांचा प्रतिक्रियेस नकार
महापौर व पक्षनेत्यांनी केलेल्या आरोपांविषयी पत्रकारांनी आयुक्तांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता, या विषयी कोणतेही भाष्य करायचे नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.