Tuesday, March 18, 2025
Homeक्रिडाविश्वरोहित शर्मा दुहेरी पदांचा मानकरी..! एकदिवसीय संघाचा कर्णधार, कसोटीसाठी उपकर्णधार..

रोहित शर्मा दुहेरी पदांचा मानकरी..! एकदिवसीय संघाचा कर्णधार, कसोटीसाठी उपकर्णधार..

मुंबईकर रोहित शर्माकडे अखेर भारताच्या एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले. त्यामुळे आता विराट कोहली फक्त कसोटी प्रकारात भारताचे नेतृत्व करणार असून अजिंक्य रहाणेऐवजी कसोटी संघाच्या उपकर्णधारपदीसुद्धा रोहितचीच नियुक्ती करण्यात आली आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या आगामी कसोटी मालिकेसाठी बुधवारी भारताच्या १८ खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय निवड समितीने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करतानाच रोहितच्या नावावर एकदिवसीय संघाचा कर्णधार आणि कसोटीचा उपकर्णधार म्हणून शिक्कामोर्तब केले.

अमिरातीत झालेल्या विश्वचषकानंतर कोहलीने भारताच्या ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले. फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी तसेच आयसीसी स्पर्धा जिंकण्यात अपयशी ठरल्यामुळे कोहली एकदिवसीय संघाच्या नेतृत्वपदावरून पायउतार होण्याची शक्यताही गेल्या काही दिवसांपासून वर्तवण्यात येत होती. तसेच रहाणे गेल्या काही काळापासून कसोटीत सातत्याने सुमार कामगिरी करत असल्याने त्याचेही उपकर्णधारपद धोक्यात होते.

आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी रहाणेसह चेतेश्वर पुजारा आणि वेगवान गोलंदाज इशांत शर्मा या तिघांचेही संघातील स्थान कायम राखण्यात आले आहे. परंतु रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि शुभमन गिल या तिघांना दुखापतीमुळे या मालिकेला मुकावे लागणार आहे. याव्यतिरिक्त न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेतून विश्रांती घेणारा रोहित, ऋषभ पंत, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी या पाच जणांचे संघात पुनरागमन झाले आहे. के. एल. राहुलसुद्धा दुखापतीतून सावरला असल्याने तो रोहितच्या साथीने सलामीला येईल. तर मयांक तिसरा सलामीवीर म्हणून आफ्रिका दौऱ्यावर जाईल, हे आता स्पष्ट झाले आहे. हनुमा विहारीला ११ महिन्यांनी भारताच्या कसोटी संघात पुन्हा स्थान देण्यात आले आहे.

कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), के. एल. राहुल, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमरा, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज. ’ राखीव खेळाडू : नवदीप सैनी, सौरभ कुमार, दीपक चहर, अर्झन नागवालवाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments