चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने २०२१ मध्ये चांगली कामगिरी करणे सुरूच ठेवले आहे. आधी आयपीएल २०२१, नंतर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि आता विजय हजारे ट्रॉफी. त्याच्या बॅटने सतत धावांचा पाऊस पाडला आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने पहिल्या तीन सामन्यांमध्ये सलग तीन शतके झळकावली आहेत.
शनिवारी केरळविरुद्धच्या महाराष्ट्राच्या तिसऱ्या सामन्यात ऋतुराज गायकवाडने सलग तिसरे शतक झळकावले. महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या गायकवाडने आज १२९ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १२४ धावा केल्या. यापूर्वी त्याने ८ डिसेंबर आणि ९ डिसेंबर रोजी मध्य प्रदेश आणि छत्तीसगडविरुद्ध शतके झळकावली होती.
त्याने मध्य प्रदेश आणि छत्तीसगडविरुद्ध अनुक्रमे १३६ आणि नाबाद १५४ धावा केल्या. तो या स्पर्धेत आतापर्यंत सामन्यात ४१४ धावा करत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याचे हे सलग तिसरे शतक आहे. केरळविरुद्ध खेळताना सुरुवातीलाच पहिल्या ५ षटकांत महाराष्ट्राचे २ गडी बाद झाल्यानंतर कर्णधार ऋतुराजने डाव सावरला. त्याने राहुल त्रिपाठीसह ३४ षटकांत १९५ धावांची मोठी भागीदारी केली आणि संघाची धावसंख्या २९० पर्यंत नेली.
ऋतुराज गायकवाडचा धडाकेबाज फॉर्म यंदाही कायम आहे. यापूर्वी आयपीएल २०२१ मध्ये त्याने १६ सामन्यात ६३५ धावा करून ऑरेंज कॅप जिंकली होती. त्याच्या शानदार खेळामुळे सीएसकेला चौथ्यांदा आयपीएल चॅम्पियन बनण्याचा मान मिळाला.
यानंतर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही गायकवाडने ५ डावात ३ अर्धशतकांसह २५९ धावा केल्या. तिथेही तो महाराष्ट्राचा कर्णधार होता. या टी-20 स्पर्धेतही त्याने सलग तीन अर्धशतके झळकावली. या स्पर्धेत त्याने लागोपाठ ३ शतके झळकावून आगामी आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियामध्ये स्थान मिळवले आहे.