Friday, September 29, 2023
Homeताजी बातमी“रिस्क” वाढली पिंपरी-चिंचवडकरांनो, वेळीच जागे व्हा आणि काळजी घ्या, आमदार लक्ष्मण जगताप...

“रिस्क” वाढली पिंपरी-चिंचवडकरांनो, वेळीच जागे व्हा आणि काळजी घ्या, आमदार लक्ष्मण जगताप यांचे आवाहन

२५ नोव्हेंबर २०२०
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन आणि कोरोना योद्ध्यांनी अथक प्रयत्न करून शहरातील कोरोना नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले. त्यात यश आल्याचे दिसत असतानाच शहरात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. कोरोनाच्या लक्षणांमध्येही बदल झाल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत. मास्क न लावता फिरणे, सुरक्षित अंतरांचे निकष न पाळणे तसेच वेळीच तपासण्या न करणे अशा प्रकारांमुळे कोरोनाचा संसर्ग पुन्हा उचल खात आहे. त्यामुळे घराबाहेर पडल्यास रिस्क आहे हे आता पिंपरी-चिंचवडकरांनी समजून घ्यावे. हे रिस्क कमी करणे आपल्याच हातात असून, नागरिकांनी प्रशासनाला सातत्याने सहकार्याची भूमिका दाखवायला हवी, असे आवाहन आमदार लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी-चिंचवडकरांना केले आहे.

यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, “पिंपरी-चिंचवडमध्ये जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या तीन महिन्यात कोरोना संसर्गाचा फैलाव झाला. तो नियंत्रणात आणण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागणार होते. महापालिका प्रशासनाने प्रयत्नांची शिकस्त करून कोरोनाचे वाढणारे प्रमाण ऑक्टोबर महिन्यात नियंत्रित केले. कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या जोडीला स्थानिक डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांनीही मोलाची कामगिरी बजावली. मात्र मास्क न लावता फिरणे, सुरक्षित अंतरांचे निकष न पाळणे तसेच तपासण्या न करणे अशा प्रकारांमुळे शहरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा उचल खाऊ शकतो, अशी भीती वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. ती आता खरी ठरताना दिसत आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे. कोरोना रुग्णसंख्येचे वाढणारे प्रमाण मोठे नसले तरीही शहरात ते कायम नियंत्रणात राहणे गरजेचे आहे. अनेक जणांना कोरोना संसर्ग संपल्यासारखे वाटते. त्यामुळे मास्क न घालता फिरण्याचे प्रमाणही वाढले आहे. घराबाहेर जाऊन खरेदी तसेच गर्दी केल्यामुळे कोरोना संसर्ग वाढल्याचे दिसत आहे. शहरातील डॉक्टरांकडे ताप, सर्दी, तीव्र डोकेदुखी तसेच अंगदुखी ही लक्षणे घेऊन आलेल्या रुग्णांचे प्रमाण हळूहळू वाढते आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांनी सतर्क होण्याची गरज आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाने स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची पूर्वीइतकीच काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

कोरोनाविरोधात लढाईसाठी महापालिकेची वैद्यकीय आणि आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. परंतु, नागरिक म्हणून सर्व पिंपरी-चिंचवडकरांचीही त्यांना साथ मिळणे ही तेवढीच महत्त्वाची बाब आहे. दिवाळीचा उत्सव साजरा करून नागरिक फिरायला, नातेवाईकांना भेटायला मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत. हे अत्यंत धोकादायक ठरू शकते. आपल्या सर्वांसाठी आगामी महिना-दीड महिन्याचा कालावधी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांनो विनाकारण घराबाहेर पडणे टाळा, बाजारात, दुकानात, मॉलमध्ये गर्दी करणे टाळा, घराबाहेर पडताना मास्कशिवाय बाहेर पडू नका, घरात लहान मुले असतील तर विशेष काळजी घ्या, असे आवाहन आमदार जगताप यांनी केले आहे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments