वारकऱ्यांच्या भावानांना दुखवून देहू येथे रिंग रोड बांधला जाणार नाही. रिंग रोड उभारताना संत तुकाराम महाराज यांचा पदस्पर्श झालेल्या भंडारा डोंगराला धक्का लागणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच अयोध्येतील राम मंदिराप्रमाणेच देहू येथील तुकोबारायांचे मंदिर जगातील सर्वांत भव्य, दिव्य मंदिर असेल असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ते आज पुण्यातील देहू (२९ जानेवारी) येथे बोलत होते.
संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीला वंदन करायला आणि वारकऱ्यांना भेटायला आल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, संत तुकोबारायांच्या दर्शनासाठी भंडारा डोंगर येथे छत्रपती शिवाजी महाराज आले होते. अशा पावन भूमीत येण्याचे भाग्य आपल्याला मिळाले आहे. भंडारा डोंगर आगळ्यावेगळ्या ऊर्जेने भरला आहे. या परिसराचा विकास करताना या श्रद्धास्थानाचे पावित्र्य कायम राहिले पाहिजे. विकासकामे करताना वारकऱ्यांच्या श्रद्धेला ठेच लागू देणार नाही. त्यामुळेच रिंगरोडच्या मार्गातही बदल करण्यात आला. अयोध्येतील श्रीराम मंदिराप्रमाणे जगातील अतिशय भव्य मंदिर इथे उभे राहिल. श्रद्धा आणि तळमळ असल्यास अशी कामे उभी राहतात. श्री क्षेत्र भंडारा डोंगर परिसराचा चांगला विकास आराखडा तयार करावा, त्यासाठी शासनाचे सर्व सहकार्य राहील, असे श्री.शिंदे म्हणाले.
रिंग रोड ही शहराची गरज असते, पण…
“रस्ते, बायपास रोड, रिंग रोड ही शहराची गरज असते. मात्र येथील भंडारा डोंगराला संत तुकाराम महाराजांचा पदस्पर्श झालेला आहे, असे समजले. याबाबत मी अधिक माहिती घेतली. त्यानंतर या डोंगराला काहीही होता कामा नये. हा रस्ता वळवून उभारा, असे मी सांगितले,” अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
“वारकऱ्यांच्या तसेच लोकांच्या श्रद्धेला ठेच पोहोचवून विकास करणारे आपण राज्यकर्ते नाहीत. येथे जबरदस्त, भव्य, दिव्य तुकोबारायांचे मंदिर तयार होत आहे. पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली अयोध्येतील राम मंदिराचे काम होत आहे. बाळासाहेब ठाकरे यांचीदेखील अयोध्येत राम मंदिर उभे राहावे, अशी इच्छा होती. तशाच प्रकारचे काम देहू येथे होत आहे. तिकडे श्रीराम मंदिर उभे राहात आहे. तर इकडे तुकोबारायांचे मंदिर उभे राहात आहे. हा दैवी योगायोग आहे,” असेही शिंदे म्हणाले.