२१ जानेवारी २०२१,
कोरोना काळात आलेल्या अध्ययन-अध्यापनातील मर्यादा लक्षात घेऊन बारावीच्या सुधारित विषय योजना आणि मूल्यमापन योजना यंदासाठी स्थगित करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अंतिम संधी म्हणून त्यांनी आधी निवडलेल्या विषयाची परीक्षा देण्याची संधी देण्यात आली आहे.
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून बारावीसाठी सुधारित विषय योजना आणि मूल्यमापन योजना करण्यात आली होती. त्यात अवेस्ता, सामान्य ज्ञान, हिंदी उपयोजित, मराठी साहित्य, इंग्रजी साहित्य असे काही विषय बंद करण्यात आले. तर शाखांतील विषय निवडीचे पर्याय बदलण्यात आले होते. या बदलांची दखल न घेता काही महाविद्यालयांनी संबंधित विषयांचे अध्यापन सुरूच ठेवले. त्यामुळे राज्य मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यात अडचणी निर्माण झाल्या. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने नवीन मूल्यमापन योजना यंदापुरती स्थगित करण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध के ला आहे.
यंदा अंतिम संधी म्हणून बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांनी निवडलेल्या विषयांची परीक्षा देण्याची संधी देण्यात आली आहे. पुढील वर्षांपासून अशी सवलत देता येणार नाही. कनिष्ठ महाविद्यालयांनी सुधारित विषय आणि मूल्यमापन योजनेची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे. बंद झालेल्या विषयांचे आणि शाखेसाठी उपलब्ध नसलेल्या विषयांचे अध्यापन बंद करणे आवश्यक आहे, असे शासन निर्णयाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.