७ जुलै २०२१,
जगभरातील प्रसारमाध्यमांवर लक्ष ठेवणाऱ्या रिपोटर्स सॅन्स फ्रण्टीयर्स (आरएसएफ) या संस्थेने प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी करणाऱ्या जागतिक नेत्यांच्या यादीमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश केलाय. प्रिडेटर्स ऑफ प्रेस फ्रिडम म्हणजेच प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याची शिकार करणाऱ्या नेत्यांच्या यादीबरोबरच निर्दयी गोष्टींना प्राधान्य देणाऱ्या नेत्यांच्या यादीमध्येही मोदींचा समावेश करण्यात आलाय. विशेष म्हणजे जगभरामध्ये आपल्या हुकुशाही वागणुकीसाठी ओळखला जाणारा उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग-उन, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जीनपिंग यासारख्या नेत्यांच्या यादीत मोदींचाही समावेश करण्यात आलाय.
प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या जगभरातील ३७ मोठ्या नेत्यांची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये इराणचे अली खामेनी, सिरीयाचे बशर अल असद, म्यानमार लष्कराचे जनरल मीनन आऊंग हिलींग, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांचाही समावेश आहे.
पाच वर्षानंतर पहिल्यांदाच जारी करण्यात आलेल्या या यादीमधील प्रिडेटर्स ऑफ प्रेस फ्रिडममधील काही नेते हे मागील दोन दशकांपासून प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी करत असून काहींचा नुकताच या यादीमध्ये समावेश करण्यात आल्याचं आरएसएफने म्हटलं आहे. आरएसएफचं मुख्य कार्यालय फ्रान्समध्ये असून ही एक बिगर सरकारी सेवाभावी संस्था आहे. प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य जपण्यासाठी ही संस्था काम करते. या संस्थेने जारी केलेल्या यादीमध्ये पहिल्यांदाच महिला नेत्यांचाही समावेश करण्यात आल्यात. बांगलादेशच्या शेख हसीना आणि हाँगकाँगच्या कारीर लॅम या दोघींचा या यादीत समावेश आहे. तसेच हंगेरीच्या व्हिक्तोअर ओरबान यांचाही या यादीमध्ये समावेश आहे.
प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्यावर गदा आणण्यासाठी या सर्व नेत्यांनी सेन्सॉरशीप, पत्रकारांना थेट तुरुंगात डांबणे किंवा त्यांच्याविरोधात हिंसा घडवून आणण्यासारख्या गोष्टी केलेल्या आहेत. तसेच काही नेत्यांचा तर पत्रकारांच्या हात्या घडवून आणण्यामध्येही सहभाग असल्याचा धक्कादायक आरोप आसएसएफने केलाय.
मोदींबद्दल काय म्हटलं आहे?
मोदींचा उल्लेख प्रिडेटर सिन्स टेकिंग ऑफिस म्हणजेच सत्तेत आल्यापासून प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी करणारे नेते असा करण्यात आलाय. तसेच या अहवालाच्या सुरुवातील देण्यात आलेल्या प्रस्तावनेमध्ये प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्यासंदर्भातील जागतिक यादीमध्ये भारताचा क्रमांक २०२१ साली १८० पैकी १४२ वा असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. आरएसएफच्या या यादीवर मंगळवार रात्रीपर्यंत भारत सरकारने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.