पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या विशेष शाखा-2 कार्यालयाचे नूतनीकरण पूर्ण करण्यात आले असून, कार्यालयाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्याच्या उद्देशाने अधिकारी व अंमलदारांच्या कार्यालयीन पोशाखामध्येही बदल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त मा. श्री. विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
नवीन पोशाखानुसार पोलीस अधिकाऱ्यांसाठी पांढरा शर्ट व काळी पँट, तर पोलीस अंमलदारांसाठी फिकट निळा शर्ट व ग्रे रंगाची पँट निश्चित करण्यात आली आहे. तसेच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा लोगो असलेला कोटही वापरण्यात येणार आहे. यामुळे कार्यालयीन शिस्त, एकसमानता आणि व्यावसायिकता अधिक बळकट होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
विशेष शाखा-2 कार्यालयाच्या नूतनीकरणाचे उद्घाटन ४ ऑगस्ट २०२६ रोजी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी नूतनीकरण फलकाचे अनावरण करून फीत कापत कार्यालयाचे उद्घाटन केले.
याप्रसंगी पोलीस आयुक्त चौबे यांनी अधिकारी व अंमलदारांना शुभेच्छा देत नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद सेवा देण्यासाठी समर्पित भावनेने काम करण्याचे निर्देश दिले. आधुनिक सुविधा, सुयोग्य कार्यालयीन वातावरण आणि अद्ययावत कार्यपद्धतीमुळे नागरिकाभिमुख सेवा अधिक प्रभावी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, डॉ. बसवराज तेली, पोलीस उपायुक्त रोहितास पवार, धीरज पाटील, गणेश इंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील पंधरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नरवाड तसेच विशेष शाखा-2 आणि परकीय नागरिक नोंदणी विभागातील अधिकारी उपस्थित होते.


