पुणे,८ मार्च : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपासून मोठा बदल झाला असून, सर्व उड्डाणे आता नवीन एकत्रित टर्मिनल इमारतीतून (NITB) सुरू झाली आहेत. या नव्या टर्मिनलमुळे प्रवाशांचा अनुभव अधिक सुखद झाला असून, अत्याधुनिक सुविधा आणि भव्य अधोसंरचनेचा लाभ मिळत आहे.
अत्याधुनिक सुविधा आणि भव्य टर्मिनल
भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (AAI) माहितीनुसार, नवीन टर्मिनल ५२,००० चौरस मीटर क्षेत्रात विस्तारले असून, १० एरोब्रिजेसद्वारे बोर्डिंग आणि डिबोर्डिंग प्रक्रिया सुलभ झाली आहे. या टर्मिनलमध्ये:
• ३४ चेक-इन काउंटर आणि २५ सेल्फ-चेक-इन कियोस्क्स
• ५ बॅगेज कॅरॉसेल्स, त्यापैकी २ आंतरराष्ट्रीय आगमनासाठी समर्पित
• प्रशस्त लाउंज, विविध खाद्यपदार्थ आणि खरेदीसाठी आकर्षक स्टोअर्स
• ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञान, GRIHAच्या चार-तारांकित दर्जासह
या सुविधांमुळे विमानतळाची वार्षिक प्रवासी क्षमता ९ दशलक्षपर्यंत वाढली असून, जागतिक दर्जाच्या विमानतळांशी सुसंगत अधोसंरचना उभारण्यात आली आहे.
जुने टर्मिनल इतिहासजमा
पुणे विमानतळाचे संचालक संतोष धोके यांनी सांगितले की, “आता सर्व १६ आगमन आणि १६ निर्गमन उड्डाणे नवीन टर्मिनलवरून सुरू झाली आहेत. जुन्या टर्मिनलचे पाडकाम आणि पुनर्विकासाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.”
नव्या टर्मिनलच्या रचनेत महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडते. पारंपरिक कला आणि आधुनिक अधोसंरचनेचा सुंदर संगम यामध्ये पाहायला मिळतो, असे धोके यांनी स्पष्ट केले.
पुण्याच्या विमानसेवेला नवी दिशा
नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या बदलाला ‘पुण्याच्या विमानसेवेसाठी मैलाचा दगड’ असे संबोधले. ते म्हणाले, “हे अत्याधुनिक टर्मिनल प्रवाशांना जागतिक दर्जाचा अनुभव देत आहे. विकास आणि उत्कृष्टतेसाठी सरकारच्या कटिबद्धतेचे हे प्रतिक आहे.”
या नव्या टर्मिनलमुळे पुण्याच्या विमानसेवेत मोठा बदल घडला असून, शहराच्या विकासाला नवी गती मिळत आहे, यात शंका नाही.