त्रिरत्न बौद्ध महासंघ, पिंपरी केंद्राच्या वतीने पिंपरी-भाटनागर येथील नव्याने सुसज्ज करण्यात आलेल्या ‘धम्मानुस्मृती विहार’ चे उद्घाटन अत्यंत मंगलमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. तब्बल ३३ वर्षांनंतर या बौद्ध विहाराचे सुशोभीकरण करण्यात आले असून, यासाठी आवश्यक असलेला संपूर्ण निधी आमदार अमित गोरखे यांच्या आमदार निधीतून मंजूर करण्यात आला.
या विहाराची मूळ संकल्पना १९९२ साली साकारण्यात आली होती. मात्र, दीर्घ काळात त्याकडे कोणीच लक्ष दिले नव्हते. आता आधुनिक स्वरूपात व सुविधांनी सज्ज असलेला हा धम्मविहार पुन्हा एकदा समाजाच्या सेवेसाठी खुला करण्यात आला आहे.
उद्घाटनप्रसंगी आमदार अमित गोरखे म्हणाले, “बाबासाहेबांच्या विचारांवर चालणाऱ्या या बौद्ध विहारासाठी माझ्या आमदार निधीतून काम करण्याचे भाग्य मिळाले, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मागील ३३ वर्षांत दुर्लक्षित राहिलेल्या या विहाराचे पुनरुज्जीवन हे माझे सामाजिक कर्तव्य आहे. धम्मप्रिय बांधवांचा उत्साह आणि समाधान बघून मनाला अत्यंत आनंद झाला.”
ते पुढे म्हणाले, “धम्मविहार हा केवळ धार्मिक केंद्र नसून सामाजिक परिवर्तनाची गंगा वाहणारे केंद्र ठरेल. लवकरच इथे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासिकाही उभारण्याचा मनोदय आहे. हे विहार भावी पिढ्यांना बौद्धिक, नैतिक व समतेच्या मूल्यांची जाणीव करून देणारे प्रेरणास्थान ठरेल.”
कार्यक्रमाला दिपक मेवानी, सौ. कोमल मेवानी, राजकिरण दाभाडे, जयेश चौधरी, महादेव सोनवणे, रंगनाथ साळवे, रणजीत कांबळे, शिवा पिल्ले, मारुती सोनटक्के यांच्यासह विविध पदाधिकारी आणि धम्मप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे पिंपरी-चिंचवडमधील बौद्ध समाजात नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.