चाकण येथील ‘श्री खिमत ज्वेलर्स’ या दुकानावर गॅस कटरने शटर कापून धाडसी चोरी करणाऱ्या परराज्यातील टोळीचा पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा, युनिट-३ ने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी तब्बल ५५० किलोमीटरपर्यंत सीसीटीव्ही फुटेजचा तांत्रिक मागोवा घेत गुजरात आणि राजस्थानमधून ४ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून ३० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नेमकी घटना काय?
२२ एप्रिल २०२६ च्या रात्री चाकण बाजारपेठ येथील श्री खिमत ज्वेलर्सचे अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरने शटर आणि लोखंडी ग्रिल तोडून दुकानातील ७७ लाख २२ हजार रुपयांचे दागिने आणि रोकड लंपास केली होती. याप्रकरणी भरत सुमेरमल वंजारा यांनी चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
तपासाचा थरार
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी तात्काळ तपासाचे आदेश दिले होते. गुन्हे शाखा युनिट-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक विश्लेषण केले असता, एक संशयित कार गुजरातच्या दिशेने गेल्याचे दिसले. तब्बल ५५० किमी अंतरावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून पोलिसांनी आरोपींना निष्पन्न केले.
दुकानातील नोकरच निघाला सूत्रधार
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची सखोल चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. या दुकानात काम करणारा किशन रामलाल सोनी यानेच चोरट्यांना दुकानाच्या चाव्या पुरवल्या होत्या आणि त्याच्या सांगण्यावरूनच ही घरफोडी करण्यात आली होती. पोलिसांनी याप्रकरणी हिम्मतकुमार साळवी, मुकेश साळवी, राधेशाम साळवी आणि पुखराज लौहार यांना अटक केली आहे.
जप्त केलेला मुद्देमाल
• चांदीचे दागिने: २७ लाख रुपये किमतीचे १७.८०० किलो चांदीचे दागिने व मूर्ती.
• बेन्टेक्स दागिने: २० हजार रुपये किमतीचे २.९०० किलो बेन्टेक्स दागिने.
• वाहन: गुन्ह्यात वापरलेली ३ लाख रुपये किमतीची मारुती स्विफ्ट कार.
• एकूण जप्ती: ३० लाख २० हजार रुपये.
या गुन्ह्यातील इतर दोन आरोपी सुमित बंगाली आणि कालु (रा. सुरत) यांचा पोलीस शोध घेत आहेत.
ही उल्लेखनिय कामगिरी युनिट-३ च्या पथकाने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, आणि गुन्हे शाखेचे उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.


