Sunday, July 20, 2025
Homeताजी बातमीबोपखेलवासीयांना दिलासा,खडकी-बोपखेल पुल ऑगस्टमध्ये होणार सुरु

बोपखेलवासीयांना दिलासा,खडकी-बोपखेल पुल ऑगस्टमध्ये होणार सुरु

बोपखेल व खडकीला जोडणाऱ्या मुळा नदीवरील पुलाचे काम ९८ टक्के पूर्ण झाले आहे. ऑगस्ट २०२४ अखेरीस पुल वाहतुकीस खुला करण्यात येणार आहे. त्यामुळे सन २०१५ पासून १६ किलोमीटरचा वळसा मारून पिंपरीत यावे लागत असलेल्या बोपखेलवासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. वाहतूक अंतर व वेळ कमी होणार आहे.

बोपखेल गावासाठी दापोडी येथील कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरींग (सीएमई) हद्दीतून जाणारा नागरी रस्ता मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १३ मे २०१५ रोजी बंद करण्यात आला होता. त्यामुळे बोपखेल गावातील रहिवाशांना दापोडीकडे जाण्याकरीता पूर्वी लागणारे दोन किलोमीटरचे अंतर रस्ता बंद झाल्यामुळे सुमारे १६ किलोमीटर झाले. त्यामुळे बोपखेल येथील नागरीकांना पिंपरी-चिंचवड शहरात ये-जा करण्यासाठी भोसरी किंवा विश्रांतवाडी, खडकी मार्गावरुन सुमारे १५ ते १६ किलोमीटर अंतराचा वळसा घालावा लागत होता. त्यामुळे नागरिकांसह, विद्यार्थी व कामगारांची मोठी गैरसोय होत होती.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बोपखेल ते खडकी असा मुळा नदीवर १८५६ मीटर म्हणजे सुमारे दोन किलोमीटर अंतराचा पुल बांधण्याचे काम महापालिकेने २० जुलै २०१९ रोजी हाती घेतले. पूल व जोडरस्त्याचे काम टी ॲण्ड टी इन्फ्रा कंपनी करीत आहे. न्यायालयीन प्रक्रिया, संरक्षण विभागाकडून जागा ताब्यात येण्यास विलंब आदी कारणांमुळे या पुलाचे काम रखडले होते. त्यामुळे कामाला चोवीस महिने मुदतवाढ दिली होती. पुलाची लांबी १८५६ मीटर तर रुंदी ८.४० मीटर आहे. पोहच रस्त्यांची लांबी बोपखेलच्या बाजुने ५८ मीटर आहे. तर, खडकीच्या बाजूने २६२ मीटर असे बांधकाम करण्यात आले आहे. आजअखेर पुलाचे काम ९८ टक्के पूर्ण झाले असून ऑगस्ट २०२४ अखेरीस पुल वाहतुकीस खुला करण्याचे नियोजन आहे.

या पुलाच्या जागेमध्ये संरक्षण विभागाच्या आस्थापना व वसाहतीसाठी विद्युत पुरवठा करणाऱ्या येत असलेल्या महापारेषण विभागाच्या अति उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या व मनोऱ्यामुळे कामास अडथळा निर्माण झाला होता. सद्यस्थितीत उच्च दाब विद्युत वाहिन्या व मनोरे १८ मे २०२४ रोजी स्थलांतरीत करण्यात आले आहेत. अनुषंगिक स्थापत्य विषयक कामे पूर्णत्वाकडे आहेत. या प्रकल्पामुळे नागरिकांना व विद्यार्थ्यांना २.९ किलोमीटर अंतरावरावरून खडकी कटक मंडळ भागातून पिंपरी-चिंचवड व पुणे शहराकडे ये-जा करण्यास सुलभ होणार आहे. परिणामी, नागरिकांचा वेळ व इंधन खर्च वाचणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments