संपूर्ण किनारपट्टीसह, घाटमाथा, विदर्भातील गडचिरोली, गोंदिया, भंडारा आणि मराठवाड्यातील लातूर, नांदेड जिल्ह्यांत पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. रत्नागिरी, रायगडला ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे.
हवामान विभागाचे शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी म्हणाले, बंगालच्या खाडीत तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओदिशाच्या किनारपट्टीकडे सरकले आहे. पुढील २४ तासांत कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता आणखी वाढणार आहे. त्यानंतर हे कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम बंगालच्या दिशेने जाईल. या कमी दाबाच्या क्षेत्राचा कोणताही फटका राज्याला बसणार नाही. मात्र, या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील दोन दिवस राज्यात चांगला पाऊस होईल. या शिवाय पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. एकूण परिस्थिती मोसमी पावसासाठी पोषक असल्यामुळे राज्यात मोसमी पाऊस सक्रिय झाला आहे. पुढील २४ तासांत कोकण, गोव्यात पावसाचा जोर वाढणार आहे. प्रामुख्याने रायगड आणि रत्नागिरी, घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यातील नांदेड, लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा अंदाज आहे. विदर्भातील गडचिरोली, गोंदिया, भंडारा जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्याच्या अन्य भागांतही हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
किनारपट्टीवर पावसाचा जोर
मागील २४ तासांत कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम होता. अलिबागमध्ये ३४.७, डहाणूत २३.१, हर्णेत ६१.६. कुलाब्यात २८.२. सांताक्रुजमध्ये ५५.९, रत्नागिरीत ५०.३ मिमी पाऊस झाला आहे. विदर्भात हलका पाऊस पडला. चंद्रपूरमध्ये सर्वाधिक १७.२ मिमी पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातही हलका होता. महाबळेश्वरात १६९.३ मिमी, कोल्हापुरात १३.५, सोलापुरात २३.१ मिमी पाऊस पडला आहे. मराठवाड्यात पावसाचा जोर होता. नांदेडमध्ये ४०.६, उस्मानाबादमध्ये १८.९, परभणीत २०.६ मिमी पावसाची नोंद झाली.
रेड अलर्ट
रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा (घाटमाथा)
ऑरेंज अलर्ट
मुंबई, ठाणे, पालघर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, लातूर, नांदेड, गडचिरोली, गोंदिया, भंडारा