महापौर रवि लांडगे यांचे प्रतिपादन; ‘अभय योजना’ व महिला बचतगटांचा मोलाचा वाटा
नियोजनबद्ध कामकाज, काटेकोर अंमलबजावणी आणि वेळेवर घेतलेल्या निर्णयांमुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मालमत्ता कर संकलनात यंदा उल्लेखनीय वाढ झाल्याचे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले. या यशामागे करसंकलन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अविरत परिश्रम आणि जबाबदारीची जाणीव महत्त्वाची ठरल्याचे त्यांनी नमूद केले.
निगडी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १८ विभागीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याच वेळी २०२६-२७ या वर्षासाठी मालमत्ता कर बिल वाटप मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महिला बचत गटांना प्रशिक्षण देणारी कार्यशाळाही पार पडली.
कार्यक्रमास उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, महिला व बालकल्याण समिती सभापती राणी माई पठारे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, तसेच नगरसेविका सुलभा उबाळे, निकिता कदम, सारिका मासुळकर, नीता पाडळे आदींसह उपायुक्त सचिन पवार व जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.
महापौर लांडगे म्हणाले, “महिलांच्या सहभागामुळे कर वसुलीत सकारात्मक वाढ झाली आहे. ‘अभय योजना’मुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून सुमारे ७० हजार मालमत्ताधारकांनी याचा लाभ घेतला. यंदा ५ लाखांहून अधिक नागरिकांनी ऑनलाइन कर भरला, ही प्रशासनावरील विश्वासाची पावती आहे.” तसेच बचत गटातील महिलांना वर्षभर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
उपमहापौर शर्मिला बाबर यांनी ‘सिद्धी’ अॅपच्या माध्यमातून कर प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक झाल्याचे सांगितले. “गेल्या तीन वर्षांत ६०० हून अधिक महिलांना या उपक्रमातून रोजगार मिळाला असून त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना मिळाली आहे,” असे त्या म्हणाल्या.
स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी ९६१ कोटी रुपयांची वसुली ही केवळ आकडेवारी नसून महापालिकेची भक्कम कमाई असल्याचे नमूद केले. “महिलांच्या माध्यमातून बिल वाटप आणि ‘अभय योजना’ची प्रभावी अंमलबजावणी यामुळेच ही विक्रमी वसुली शक्य झाली,” असे त्यांनी सांगितले.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी १८ विभागीय कार्यालयांमध्ये ‘परफॉर्मर ऑफ द डे’सारख्या स्पर्धांमुळे कामात स्पर्धात्मकता वाढल्याचे सांगितले. बचत गटांच्या माध्यमातून कर बिल वाटप करणारी पिंपरी-चिंचवड महापालिका देशातील एकमेव संस्था असल्याचा दावा त्यांनी केला.
कार्यक्रमात ‘अभय योजना’ प्रभावीपणे राबविल्याबद्दल उपायुक्त सचिन पवार यांचे विशेष कौतुक करण्यात आले. प्रास्ताविक सचिन पवार यांनी तर सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.


