रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचे ढग अजून गडद होताना दिसत आहेत. रशियाने आक्रमक भूमिका घेतली असून युक्रेनमधील दोन प्रांताना राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी युक्रेनमधील डॉनेत्स्क आणि लुहान्स्क या दोन प्रांतांना राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे. जनतेला संबोधित करताना त्यांनी ही घोषणा केली असून यामुळे तणाव आणखी वाढण्याची भीती आहे. रशियाच्या या निर्णयामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.
लुहान्स आणि डोनेस्क हे दोन प्रांत बंडखोरांच्या ताब्यात असून त्यांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देण्याच्या करारावर पुतीन यांनी स्वाक्षरी केली आहे. रशियाने या दोन्ही प्रांतांमध्ये सैन्य तैनात करण्यास सुरुवात केली आहे. पूर्व युक्रेनमधील रशियाचा पाठिंबा असलेल्या फुटीरतावादी भागांच्या स्वातंत्र्याला मान्यता देण्याबाबत विचार करण्यासाठी व्लादिमिर पुतीन यांनी सोमवारी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना पाचारण केलं होतं.
आपल्याला स्वतंत्र देश म्हणून मान्यता द्यावी आणि युक्रेनच्या कथित लष्करी आक्रमणाविरुद्ध संरक्षणासाठी लष्करी मदतीची तरतूद करणाऱ्या मैत्रीच्या करारांवर स्वाक्षऱ्या कराव्या अशी विनंती फुटीरतावादी नेत्यांनी दूरचित्रवाहिन्यांवर पुतीन यांना केली होती. दरम्यान रशियाने जनतेला संबोधित करताना युक्रेनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देण्यास नकार दिला .
पुतीन यांनी जनतेला संबोधित करताना केलेल्या युक्रेन हा रशियाच्या इतिहासाचा अविभाज्य भाग आहे सागितलं तसंच पूर्व युक्रेन ही प्राचीन रशियन भूमी आहे असंही म्हटलं. रशियाची जनता आपल्या निर्णयाचं स्वागत करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. “डॉनेत्स्क आणि लुहान्स्कमधील नागरिकांच्या स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वासंबंधीचा हा निर्णय फार पूर्वीच घेतला जाणं आवश्यक होता,” असंही यावेळी ते म्हणाले.
युक्रेनने दिली प्रतिक्रिया
पुतीन यांच्या निर्णयावर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वलोडिमिर जेलेंस्की यांनी प्रतिक्रिया दिली असून आपल्याला कोणतीही भीती नसून, पाश्चिमात्य देश आपल्याला पूर्ण पाठिंबा देतील असा विश्वास व्यक्त केला आहे.


