डिजिटल पेमेंट सर्व्हिसेस, डिजिटल पेमेंट, बँकिंग आणि फायनान्स कंपन्यांच्या तक्रारींसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 24 तासांचा हेल्पलाईन नंबर सुरु करणार आहे. आरबीआयने म्हटलं की, सप्टेंबर 2021 पर्यंत देशभरात एक केंद्रीकृत हेल्पलाईन नंबर आणला जाईल. जेणेकरुन ग्राहकांना विविध डिजिटल पेमेंट प्रोडक्टची माहिती मिळू शकेल आणि त्यांच्या तक्रारी नोंदवता येतील.
वन नेशन, वन लोकपाल योजनेंतर्गत या हेल्पलाईनवर डिजिटल पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील. डिजिटल पेमेंट, बँकिंग आणि फायनान्स कंपन्यांशी संबंधित काही तक्रारी असल्यास, या क्रमांकावर नोंदणी करता येईल. शुक्रवारी आर्थिक धोरण जाहीर करताना आरबीआयने ही माहिती दिली.
आरबीआयच्या म्हणण्यानुसार, तक्रारींचे निवारण करण्यासाठी सध्या बँकिंग, नॉनबँकिंग फायनान्स कंपन्या आणि डिजिटल व्यवहारात तीन वेगवेगळे लोकपाल तयार करण्याची योजना आहे. आता या तिघांसह एक राष्ट्र, एक लोकपाल यंत्रणा कार्यान्वित होईल. या उपक्रमाचे उद्दिष्ट म्हणजे ग्राहकांना तक्रारींच्या निराकरणासाठी एकच व्यवस्था देणे. त्याअंतर्गत आरबीआय जून 2021 पर्यंत एकात्मिक योजना आणण्याची शक्यता आहे. याद्वारे, ग्राहकांना तक्रारीसाठी वेगवेगळी नाही तर एकच व्यवस्था प्राप्त होणार आहे.