अमित आढाव हा पिंपरी झोपडपट्टीत छोटय़ाशा जागेत आपल्या कुटुंबासमवेत राहतो. आई कल्पना आढाव या गेल्या १४ वर्षांपासून पालिकेच्या रुग्णालयात कंत्राटी पध्दतीने सुरक्षा कर्मचारी म्हणून काम करतात. कोणाचाही आधार नसलेल्या आणि जेमतेम पगारात, अत्यंत हालअपेष्टा सहन करत कल्पना यांनी आपल्या मुलाला शिकवले. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने रुग्णालयातील कामाबरोबरच अनेकांकडे त्यांनी धुणी-भांड्याचे कामही केले. बऱ्याच वर्षांचा खडतर प्रवास पार करत त्यांनी मुलाला जिद्दीने डॉक्टर केले. आता पुढील उच्चशिक्षणासाठी इंग्लंडला जाण्याची संधी त्याला मिळाली आहे.
पण आता अमित हा आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे तिकडे जाण्याचा विचारही करू शकत नाही. आपल्या मुलाला शिकून मोठय़ा हुद्दय़ावर बसलेले पाहायचे कल्पना यांनी स्वप्न पाहिले होते. परंतु आता पुढील उच्चशिक्षणाचा खर्च करायची कुटुंबाची ऐपत नाही. यामुळेच समाजातील दानशूर व्यक्ती तसेच संस्थांनी मदत करावी, असे आवाहन कल्पना आढाव यांनी केले आहे. अमितच्या उच्चशिक्षणासाठी रयत विद्यार्थी विचार मंचने पुढाकार घेतला आहे. त्यांनी अमित आढाव याच्या उच्चशिक्षणाची जबाबदारी पिंपरी चिंचवड महापालिकेने स्वीकारावे तसेच त्याला सर्वोतपरी मदत करावी, अशी मागणी केली आहे. यासंदर्भातील निवेदन रयत विद्यार्थी विचार मंचने महापालिका महापौर तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांना दिले आहे.
यावेळी संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे सर, महासचिव संतोष शिंदे, पिंपरी चिंचवड संघटक अमोल गायकवाड उपास्थित होते.