रावेत-निगडी परिसरातील प्रस्तावित ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला विरोध करत तो रद्द करावा आणि त्याऐवजी सुमारे २५ एकर जागेवर ऑक्सिजन पार्क उभारावे, या मागणीसाठी स्थानिक नागरिकांनी रविवारी आंदोलन केले. दुर्गा टेकडी व सेक्टर २३ येथील जलशुद्धीकरण केंद्र परिसरात नागरिक एकत्र आले. प्रकल्पामुळे पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या संभाव्य परिणामांबाबत चिंता व्यक्त करत आंदोलकांनी प्रशासनाकडे या प्रकल्पाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली.
रावेत येथील एमआयडीसीच्या सेक्टर क्रमांक १७७, १५६ आणि १५८ मधील सुमारे २५ एकर जागेवर कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणारा प्रकल्प प्रस्तावित आहे. मात्र, या परिसरात मोठ्या प्रमाणावर निवासी वसाहती आणि शैक्षणिक संस्था असल्याने प्रकल्पामुळे वायुप्रदूषण, दुर्गंधी आणि आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली. त्यामुळे या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांकडून विरोध होत आहे.
प्रकल्पाऐवजी ऑक्सिजन पार्क उभारण्याचा आग्रह
वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर परिसरातील हरित क्षेत्र जपणे आवश्यक असल्याचे सांगत आंदोलकांनी प्रस्तावित जागेवर ऑक्सिजन पार्क विकसित करण्याची मागणी केली. वृक्षारोपण, व्यायाम आणि विरंगुळ्यासाठी सुविधा उपलब्ध झाल्यास नागरिकांना त्याचा लाभ होईल, अशी भूमिका त्यांनी मांडली.
शहरातील कचऱ्याचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करणे गरजेचे असले, तरी प्रस्तावित प्रकल्पाचे नेमके स्वरूप, कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी वापरण्यात येणारे तंत्रज्ञान आणि पर्यावरणीय परिणाम याबाबत प्रशासनाने स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणीही करण्यात आली.
नागरिकांना विश्वासात घेण्याची मागणी
प्रकल्पामुळे परिसरावर होणाऱ्या संभाव्य परिणामांचे योग्य मूल्यमापन करावे, त्यावरील उपाययोजनांची माहिती नागरिकांना द्यावी आणि त्यांच्या हरकतींची दखल घ्यावी, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊनच निर्णय घ्यावा आणि पर्यावरणपूरक पर्यायांचा विचार करावा, अशी मागणी करत प्रस्तावित ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प रद्द करण्याची भूमिका आंदोलनातून ठळकपणे मांडण्यात आली.


