रौंदळ म्हणजे गोड साखरेची कडू कहाणी आहे. महाराष्ट्राची भरभराट सहकाराने साखर कारखानदारीनं झाली असली तरी त्याच्यातून वाईट प्रवृत्तींचाही शिरकाव झाला आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जिवावर राजकारणात यशस्वी झालेले तसेच यशस्वी होऊ घातलेल्या कित्येकांनी त्याच शेती पिकवणाऱ्या सर्वसामान्य शेतकऱ्यालाच पदोपदी अडवलं जाण्याचे प्रकार गेली कित्येक वर्षं आपल्या इथं घडत आहेत. सहकारातून मोठा झाला कि आमदार , खासदार होणारा कारखानदार महालात राहतो आणि पिकवणारा नेहमी शेतकरी मात्र रस्त्यावर असं निर्माण झालेलं विदारक चित्र अनेक वर्षापासून काही बदलायला तयार नाही. शेतकर्यानीं पिकवायचं आणी व्यापारयांनी वाटेल त्या भावात कमी करुन खरेदी करायचं हे पिढ्यांन पिढ्या चालत आलेले गणित आजच्या शेतकरी पुत्राला मान्य नाही , याच वास्तवादी चित्रीकरण आपल्या मराठी चित्रपटांमधून यापूर्वी कधीच घडलं नव्हतं. ते पहिल्यांदाच #रौंदळ मध्ये आपल्याला बघायाला मिळतं व हे घडविण्याच्या सर्व श्रेय या चित्रपटाचे लेखक, निर्माते, दिग्दर्शक आणि संपूर्ण टीमला जात, एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलावरील अत्याचार, अन्यायाचा कडेलोड झाल्यानंतर जे काही भीषण घडतं, याचं अत्यंत रखरखीत, खिळवून ठेवणारं आणि प्रचंड अस्वस्थ करणारं चित्रण म्हणजे #रौंदळ’ हा चित्रपट आहे.
#रौंदळ’ चित्रपटाची कथा-पटकथा-दिग्दर्शक मराठवाड्यातील शेतकरी पुत्र गजानन नाना पडोळ यांचं आहे. विषयाचं गांभीर्य आणि त्याची हाताळणी गजाजनन पडोळ यांनी अतिशय चांगली केली आहे. ते स्वतः शेतकरी असल्यामुळे विषयाचं गांभीर्य त्यांना चांगलंच ठाऊक आहे. त्यामुळेच अनेक प्रसंग अगदी खरेखुरे वाटतात. अत्याचाराखाली पिचलेला शिवा आणि त्याच्या गावाची होरपळ पूर्वार्धात पाहायला मिळते, तर उत्तरार्धात शिवानं उघडलेला तिसरा डोळा पाहायला मिळतो. डॉ. विनायक पवार यांचे संवाद आकर्षक आहेत. जिथं पिकतं तिथं विकत नाही, तसेच लोकशाही दिसली पाहीजे व तीला टिकवण्यासाठी लोकशाहीलाच रखैल ठेवणारे झारीतले शुक्राचार्य या चित्रपटात पाहायला मिळतात. दिग्दर्शकानं हे सगळे बारकावे चांगले टिपले आहेत. तसेच ऊसाच्या शेतातील शिवा आणि बिट्टू यांच्यामधील हाणामारीचा चित्रपटामधील दोन वेळचा दृश्यक्रम एकदम कडक झाला आहे. उसाच्या शेतात चिखलात झालेला राडा अतिशय उत्तम चित्रीत झालाय. चित्रपटाचा क्लायमॅक्स तर सुन्न करणारा आहे. आपल्यावर झालेल्या अत्याचाराचा बदला घेताना शिवा आणी अण्णा व बिट्टूचे साखर कारखान्यात दाखलेले फाइट सिन्स , साखर कारखान्यातून येणारा आवाज व तेथील दाखवलेली मोठ मोठे मशनरी अंगावर येते. चित्रपटामध्ये शिवा आणी नेहाच्या प्रेमाचा ॲंगल आहे.डॉ. विनायक पवार यांची अर्थपूर्ण गीतं आणि त्याला तेवढ्याच ताकदीनं हर्षित अभिराज यांनी दिलेलं सुश्राव्य संगीत आणी गायिका वैशाली माडे , जावेद अली , सोनू निगम यांच्या आवाजातील गाणी हिरव्यागार शेताच्या पार्श्वभूमीवर मनाचा ठाव घेतात.
#रौंदळ’ जमलाय तो कलाकार-तंत्रज्ञांच्या चांगल्या भट्टीमुळे, भाऊ शिंदेनं शिवाची भूमिका त्याच्या नेहमीच्या शैलीत चोख निभावली आहे. भाऊचा ख्वाडा आणि बबन नंतरचा हा तिसरा चित्रपट. त्याच्या अभिनयातील सहजता विशेष लक्षात राहते. भाऊच्या वाट्याला मोजकेच संवाद असले तरी त्याचा बोलका चेहरा आणि देहबोली या दोन गोष्टींवर तो बाजी मारून गेलाय. नायिका नेहा सोनावणेला अभिनयाच्या दृष्टीनं फारसं काम नसलं तरी ती संपूर्ण चित्रपटभर चांगली दिसली आहे. शिवाच्या आई-वडिलांची भूमिका करणारे कलावंतही लक्षात राहतात. पण यात बाजी मारलीय ती आजोबांची भूमिका साकारणाऱ्या कलावंतानं. त्याखेरीज बिट्टू शेठ झालेला यशराज डिंबळे सर्वाधिक लक्षात राहतो. स्थानिक राजकारणातील पुढाऱ्यांच्या तरुण पिढीमधला माज यशनं अगदी नेमका पकडला आहे. त्यामुळे त्याची व्यक्तिरेखा प्रचंड भाव खाऊन जाते. विक्रम अण्णा झालेले शिवराज वाळवेकर यांचा अभिनयदेखील लक्षात राहणारा आहे. रौंदळचा क्लायमॅक्स अंगावर येणारा निश्चितच आहे. पहिल्याच प्रयत्नात दिग्दर्शक गजानन पडोळ यांनी आपल्याला जे हवंय ते प्रेक्षकांपर्यंत नेमकं पोहोचवलंय. चित्रपटाच्या शेवटी नायकानं केलेल्या साखरेचा वापर कोणत्याही संवेदनशील व्यक्तीला हादरवून टाकणारा आहे. मराठी मातीमधलं हे #रौंदळ रुप प्रेक्षकांनी जरूर पाहायला हवं….!
आपण कांतारा, पठाण , वेड ला सुपरहिट केले आता वेळ आली आहे आपल्या मातीतील सिनेमाला आपलं करण्याची रौंदळला सुपरहिट करण्याची… !
संपादक-अविनाश कांबीकर