१७ डिसेंबर,
पालकांनी मुलांशी मोकळा संवाद साधणे गरजेचे असून त्यामुळे त्यांच्या मनातील सर्व शंका, अडचणी दूर होऊ शकतात. सध्या दिल्ली, उन्नाव, हैदराबाद येथील घटनांमुळे सर्वसामान्य नागरिकांचा असंतोष उफाळून आला आहे. हैद्राबाद येथील बलात्काराच्या घटनेनंतर महिलांवरील हिंसाचाराच्या मुद्याने सामाजिक वातावरण बिघडले आहे. त्यामुळे पालकांनी पुढाकार घेऊन मुलांना जास्तीत जास्त वेळ द्यावा, असे आवाहन भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी केले. भोसरीतील इंद्रायणीनगर येथे राणी पुतळाबाई वुमेन्स लॉ कॉलेज मध्ये ‘बलात्कार – कायदा तारक की मारक?’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उदघाटन आमदार लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. मुलांच्या सर्व सुखसोयी, प्रत्येक गोष्टीला पर्याय असले तरी आजकालच्या मुलांना बोअर होतं. पण आमच्या लहानपणी आम्हाला कधीच बोअर झालं नाही. कारण आम्ही एकत्र कुटुंबात वाढलो. एकत्र कुटूंब ही काळाची गरज आहे, असे मत आमदार लांडगे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबले, या कार्यक्रमाच्या मुख्य आयोजिका शाहू शिक्षण संस्थेच्या संचालिका ऍड. कोमल साळुंखे (ढोबळे), राणी पुतळाबाई वुमेन्स लॉ कॉलेजचे संचालक अजय साळुंखे, मानसोपचार तज्ञ डॉ. भक्ती एकबोटे, अमलिनी फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ. अक्षया जैन, ऍड. पी. एन. चोरघडे, ऍड. सूर्या लांडगे, ऍड. राणी सोनावणे, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक दिगंबर अडागळे तसेच विद्यार्थी आणि मान्यवर या प्ररिसंवादास मोठ्या संख्येने उपस्थित होते.
व्यसन आणि नशा याबाबत चर्चा करताना शाहू शिक्षण संस्थेच्या संचालिका ऍड. कोमल साळुंखे (ढोबळे) म्हणाल्या की, व्यसनाधीनता ही एकप्रकारची कीड आहे. वेगवेगळ्या व्यसनांबरोबर सध्या इंटरनेटचे व्यसन दिसून येत आहे. अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामध्ये अल्पवयीन मुलांचाही सहभाग असल्याच्या अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. पॉर्न साईट पाहून कोवळ्या वयातच मुलांची मानसिकता हिंसक आणि विकृत बनत असल्याचे स्पष्ट होत आहे. मानसोपचार तज्ञ डॉ. भक्ती एकबोटे म्हणाल्या की, बलात्कार रोखण्यासाठी कुटुंब पद्धती अवलंबली पाहिजे. मुली सक्षम करुन त्यांना मुलांप्रमाणे समान वागवले पाहिजे. मुलांची मानसिकता पालकच ओळखू शकतात. मुलांना शरीराची संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. आजकाल स्त्रियांच्या मानसिकतेच्या बाबतीत कधीही विचार केला जात नाही. महिलांचा सन्मान केला गेला पाहिजे. मुलींना स्वरक्षणाचे धडे दिले पाहिजेत. शाळांमध्ये लैगिक शिक्षण देणे सुरु केले पाहिजे. मुलींना सातच्या आत घरात ठेवण्यापेक्षा मुलांनाच सातच्या आत घरात ठेवावे.
अमलिनी फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ. अक्षया जैन म्हणाल्या की, इंटरनेटवर पॉर्न वेबसाईट पाहणाऱ्यांमध्ये भारतही आघाडीवर आहे. आपण एखाद्या प्रवाहाला रोखू शकत नाही. आजकालच्या प्रेमाच्या विश्वात मुलगा आणि मुलगी सज्ञान असताना बलात्काराची केस दाखल होत नाही मात्र ब्रेकअप नंतरच्या केसेस दाखल केल्या जातात त्याला कोठे तरी आळा घातला पाहिजे त्यामुळे याचा विचार आजच्या तरुणाईने करणे गरजेचे आहे. शाळांमध्ये मुले आईवडिलांपेक्षा शिक्षकांकडे जास्त असतात, शिक्षक माणूस घडवत असतो त्यामुळे पालकांनी मुलांबरोबर संवाद साधला पाहिजे.
सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक दिगंबर अडागळे म्हणाले की, पोलीस यंत्रणा सक्षम आहे, हैद्राबाद बलात्कार एन्काऊंटर प्रकरणी पोलिसांना परीस्थिती नुसार निर्णय घ्यावे लागतात. बलात्कारासारख्या घटना घडू नयेत यासाठी अल्पवयीन मुलांवर पालकांचे लक्ष असले पाहिजे. शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांचा संवाद झाला पाहिजे. पालकांनी सुद्धा शिक्षकांचे विचार समजून घेतले पाहिजेत. मुलांना मोबाईल, इंटरनेट यापासून दूर ठेवले पाहिजे, तरच मुलांवर चांगले संस्कार होतील.
हैद्राबाद एन्काऊंटर योग्य – अयोग्य? या विषयावर चर्चा करताना ऍड. पी. एन. चोरघडे म्हणाले की, हैदराबाद येथील घटनेमध्ये न्याय व्यवस्थाच्या माध्यमातून आरोपीना शिक्षा दयायला पाहिजे होती तर बलात्कारास स्त्रीयाच जबाबदार आहेत का? या प्रश्नाला उत्तर देताना ऍड. सूर्या लांडगे म्हणाले की, अशी कृती करण्यासाठी माणसाची विकृती आणि मानसिकता जबाबदार असते. ऍड. राणी सोनावणे म्हणाल्या की आपला भारतीय राज्यघटनेने केलेला कायदा खूप मजबूत आहे. बलात्कार करणाऱ्याला फाशीचीच शिक्षा आहे. अश्या कृत्याचे प्रमाण वाढत असून लैंगिक अत्याचारात वाढ झाली आहे. न्यायालयाने अशा आरोपींसाठी फास्टट्रॅक कोर्टात केस चालवून तात्काळ आरोपीना शिक्षा दिली पाहिजे. बलात्कारासारख्या धक्कादायक गोष्टी घडण्यासाठी व्यसन हे कारणीभूत असल्याचे प्रसन्ना मुसळे यांनी सांगितले. लहान मुले घरातील मोठ्यांचे अनुकरण करतात, तर संदीप राक्षे म्हणाले की तरूणांची मानसिकता विकृत होत चालली आहे. त्यामुळे तरुणांमध्ये नशा करण्याचे प्रमाण वाढले आहे. आजच्या मुलांमध्ये आत्मविश्वास पाहिजे, मात्र मुलांमध्ये नकारात्मकता जास्त वाढत चालली आहे. या परिसंवादामध्ये विद्यार्थिनीनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
दरम्यान, या परिसंवादामध्ये व्यसन / नशा, इंटरनेट – पॉर्न फिल्म, महिला – पुरूष सांखिक विषमता. पुरूषांचे लग्नाचे वाढते वय., ब्रेक – अप, बलात्कारास पुरूषच जबाबदार आहेत का ?, बलात्कार रोखण्यास कायदा कमकुवत आहे का ? बलात्कार रोखण्यासाठी उपाय, हैद्राबाद एनकाऊंटर योग्य – अयोग्य ?, पोलीस यंत्रणा सक्षम आहे का ?, प्रत्येक बलात्कारी केसमध्ये फाशीचीच शिक्षा असावी का ? अश्या विषयावर चर्चा करण्यात आली. या परिसंवादांमधून निघालेले महत्वाचे डिबेट पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवले जाणार आहेत.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्लता जगताप यांनी केले. पूजा तरस यांनी आभार मानले.