९ डिसेंबर २०२०
पुण्यातील कोथरुड भागातील महात्मा सोसायटीमधील नागरिकांसाठी आजची सकाळ आश्चर्याचा धक्का देणारी ठरली. या सोसायटीमध्ये आज सकाळच्या सुमारास एक गवा सदृश्य प्राणी दिसून आल्याने एकच खळबळ उडाली. प्रामुख्याने जंगलांमध्ये आढळून येणारा हा प्राणी लोकवस्तीमध्ये दिसून आल्याने गोंधळ उडाला.
कोथरुड सारखी दाट लोकवस्ती असणाऱ्या भागामध्ये हा प्राणी दिसून आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शहराच्या मध्य भागात गवा सदृश्य प्राणी कसा पोहचला यासंदर्भात वेगवेगळ्या चर्चा स्थानिकांमध्ये रंगल्याचे चित्र दिसत आहे. या भागामध्ये सध्या या गव्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असल्याचंही सांगितलं जात आहे.

कोथरूडमध्ये आलेल्या रानगव्याला रेस्क्यू करण्यासाठी वनविभाग घटनास्थळी पोहोचले असून पोलीस बंदोबस्तही करण्यात आला आहे. गव्याला पळून जाण्यासाठीच्या प्रत्येक मार्गावर जाळी बसवण्यात आलीये. कोथरूडमधील महात्मा सोसायटीमध्ये हा रानगवा सकाळी साडेपाचच्या दरम्यान इथल्या रहिवाश्यांना दिसून आला. गवा रस्ता चुकल्यामुळे बिथरला आहे. तो शेजारीच असणाऱ्या एनडीएच्या जंगलातून आल्याचा अंदाज आहे. पोलिस, वनविभाग कर्मचारी आणि अग्निशामक दल दाखल झाले असून मदत कार्य रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाले आहे. मात्र गवा बिथरल्याने तेथील बंगल्यांच्या भिंतींना धडका देत आहे. त्यामुळे नाक, तोंडाजवळ जखम होऊन रक्त येत आहे.