Thursday, February 6, 2025
Homeमहाराष्ट्रराममंदिर संकल्पपूर्ती आता काशी, मथुरेत मंदिर उभारणीचा संकल्प - भैय्याजी जोशी

राममंदिर संकल्पपूर्ती आता काशी, मथुरेत मंदिर उभारणीचा संकल्प – भैय्याजी जोशी

हजारो वर्षांच्या परिस्थितीनंतर देश बदलतोय, त्याची अनुभुती आपल्याला येतेय. जय श्रीरामचा नारा दिला जातोय. श्रीराम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त २२ जानेवारीपासून देशभरात भक्तीची लाट आली आहे, ती यापुढेही कायम रहावी. अयोध्येत श्रीराम लल्लाचं मंदिर झालं. अद्याप काशी आणि मथुरेचं मंदिर व्हायचं आहे. याच मार्गाने पुढे जात काशी मथुरेतही मंदिर उभारणीचा आमचा संकल्प आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाचे सदस्य भैय्याजी जोशी यांनी चिंचवड येथे बोलताना व्यक्त केले. 

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य विनायक थोरात यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त सोमवारी चिंचवड नाट्यगृहात त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा झाला. भैय्याजी जोशी आणि संघाचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव यांच्या हस्ते थोरात यांचा सत्कार करण्यात आला. प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडगावकर, प्रांत प्रचारक यशोधन वाळिंबे, कमल थोरात, कार्यक्रमाचे मुख्य आयोजक अमोल थोरात व थोरात परिवाराच्या आप्तेंष्टासह संघाचे पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी, स्वयंसेवक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.  

भैय्याजी जोशी म्हणाले की, विनायकराव थोरात यांनी बालपणापासून संघकार्यात झोकून देत समर्पित भावनेने काम केले. त्यांच्यासारखे हजारो स्वयंसेवक आणि राष्ट्रभक्तांच्या कार्यामुळे आज देश बदलत आहे. मंदिर वही बनायेंगेचा नारा देत राम भक्तांनी बाबरी ढाचा हटवला. पाचशे वर्ष हृदयाला टोचणारा काटा दूर करून आदर्शवत प्रेरणास्थान निर्माण केले. देशात मंदिरांची कमतरता नाही. मात्र, अयोध्येतील श्रीराम मंदिर हे सर्वार्थाने राष्ट्र मंदिर आहे. समाजाचा सामूहिक आनंद, सामूहिक शक्ती निर्माण करण्याच्या प्रयत्नाचा तो एक भाग आहे. त्या माध्यमातून देशाचं सातवं सोनेरी पान लिहिण्याचं भाग्य तुम्हा-आम्हाला मिळालं आहे. संघाच्या शंभर वर्षांच्या वाटचालीत विनायकरावांसारखे लाखो स्वयंसेवक संघाने घडविले. त्यामुळेच हिंदू राष्ट्र उभारणीत संघाचे आणि स्वयंसेवकांचे मोठे योगदान आहे.   

नानासाहेब जाधव म्हणाले की, शांतपणे, ध्येय ठेवून काम करणे, व्रत म्हणून काम करणे हे विनायकराव थोरात यांचे वैशिष्ट्य आहे. देशी गायीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यासाठी संघाकडून विश्वमंगल गोग्राम यात्रा काढण्यात आली. त्यात विनायकरावांचे मोठे योगदान राहिले.

सरसंघचालकांकडून विनायक थोरातांचे अभिष्टचिंतन … 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सोमवारी निगडी, प्राधिकरणात विनायक थोरात यांच्या निवासस्थानी भेट दिली आणि त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त अभिष्टचिंतन केले.

प्रास्तविक अमोल थोरात यांनी केले. सूत्रसंचालन महेश देशपांडे तर कावेरी मापारी यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments