Saturday, March 22, 2025
Homeआरोग्यविषयकमहाराष्ट्राला वेळेत पुरवठा न झाल्यास तीन दिवसांमध्ये लसीकरण बंद पडण्याची राजेश टोपेंनी...

महाराष्ट्राला वेळेत पुरवठा न झाल्यास तीन दिवसांमध्ये लसीकरण बंद पडण्याची राजेश टोपेंनी व्यक्त केली भीती

७ एप्रिल २०२१,
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडे महाराष्ट्राला आठवड्याला ४० लाख लसींचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्राला वेळेत पुरवठा न झाल्यास तीन दिवसांमध्ये लसीकरण बंद पडण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. मंगळवारी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांची ११ राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडलेल्या बैठकीत राजेश टोपे यांनी लसीकरण, ऑक्सिजन तसंच रेमडेसिवीरच्या वापरासंबंधी काही महत्वाच्या सूचना केल्या. मुंबईत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबद्दल माहिती दिली.

“प्रकाश जावडेकर यांनी तीन लाख लसीकरण करत असताना सहा लाख करण्यास सांगितलं. केंद्र सरकारकडून डोस पुरवले जातील असं सांगण्यात आलं. आम्ही साडे चार लाखांपर्यंत पोहोचलो असून लवकरच सहा लाखांपर्यंत जाऊ. पण साडे चार लाखांमध्येच लस नाही म्हणून केंद्र बंद ठेवावं लागत आहेत. लोक तिथे येत असून आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लस नाही असं सांगण्याची वेळ आली आहे. या सर्व गोष्टीला लसीचा न होणारा पुरवठा कारणीभूत आहे,” अशी खंत राजेश टोपे यांनी व्यक्त केली.

“लसीकरण करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे. जर एखादा रामबाण उपाय असेल तर आपल्यामध्ये प्रतिकारश्की निर्माण करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी लसीकरण महत्वाचा मार्ग आहे. लसीकरण मोफत आणि सुरक्षित आहे. पण लस मिळत नाही हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे मी पोटतिकडीने विनंती केली आहे. खासकरुन कोव्हॅक्सिन द्या अशी मागणी केली आहे. का देऊ नये हा भागही आग्रहपूर्वक मांडला. लस दिली तर मोठा प्रश्न सुटेल,” असा विश्वास राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे.

“सर्वात जास्त फिरणाऱ्यांमध्ये आणि करोना होणाऱ्यांमध्ये २० ते ४० वयोगटातील लोक आहेत. यामुळे या वयोगटाचं इंफेक्शन कमी करायचं असेल तर त्या पद्दतीने लवकरच १८ पुढील सर्वांचं लसीकरण गरजेचं आहे. ही काळाची मागणी आहे. इतर ठिकाणी उशीर करा पण राज्यातील तरुण तरुणींना सुरक्षित करायचं आहे त्यामुळे लवकर परवानगी द्या अशी मगाणी केली,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

“ऑक्सिजनचा तुटवडा भासण्याची शक्यता असून आम्हाला जवळच्या राज्यातून ऑक्सिजनचा पुरवठा केला पाहिजे अशी मागणी केली. ती त्यांनी गांभीर्याने नोंदवली आहे,” अशी माहितीही राजेश टोपे यांनी दिली. राजेश टोपे यांनी यावेळी रेमडेसिवीरचा वापर प्रोटोकॉलनुसार करा असं आवाहन खासगी डॉक्टरांना करत ११०० ते १४०० च्या वर विकू नये अशी विनंती केली. तसंच त्याची साठेबाजी करु नका असंही म्हणाले.

महाराष्ट्रात १४ लाख लसींचे डोस शिल्लक असून हा साठा केवळ तीन दिवस पुरेल अशी भीती व्यक्त करताना राजेश टोपे यांनी दर आठवड्याला ४० लाख लसींचा पुरवठा करण्याची केंद्राकडे मागणी केली आहे. “”महाराष्ट्रात लसीचे १४ लाख डोस शिल्लक असून ही तीन दिवसांपुरता साठा आहे. पाच लाखांच्या तुलनेत हे डोस तीन दिवसांत संपेल आणि महाराष्ट्रातील लसीकरण बंद होऊ शकेल. म्हणूनच दर आठवड्याला किमान ४० लाख लस पुरवठा केला पाहिजे. आज आम्ही साडे चार ते पाच लाखांपर्यंत आहोत. पण दोन दिवसांत दिवसाला सहा लाखांपर्यंत जाण्याची हमी मी देतो,” असं ते म्हणाले.

“केंद्र सरकार लस पाठवत नाही असं नाही पण वेग कमी आहे. ज्या पद्धतीने आव्हानात्मक बोललं जातं त्यापद्दतीने केलं जात नाही हे केंद्र सरकारला सांगणं आहे,” अशी टीका राजेश टोपे यांनी केली.

यावेळी त्यांनी लॉकडाऊन हा शब्द वापरू नका असं आवाहन केलं. केवळ शनिवारी व रविवारी लॉकडाउन आहे.. बाकीच्या दिवशी फक्त निर्बंध आहेत असं त्यांनी सांगितलं. “गरज लागल्यास ऑक्सिजनचं प्रमाण इंडस्ट्रीसाठी शून्य करुन टाकू, ऑक्सिजनचा लागणारे स्टीलचे प्लांट बंद ठेवू…पण ऑक्सिजन कमी पडू देणार नाही,” असं राजेश टोपे यांनी यावेळी सांगितलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments