“मी सर्वसमावेशक चेहरा झालेली आहे,” असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.
भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी मोठा निर्धार केला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. तसेच, २०२४ इतिहास घडवणारं म्हणजेच बदलणारं वर्ष आहे, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. त्या बीडमधील एक सभेत बोलत होत्या.
पंकजा मुंडेंनी नेमकं काय म्हटलं?
“मला राजेंद्र मस्के म्हणाले, फेटा बांधा. मी म्हटलं, फेटा बांधणार नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी फेटा बांधणार नाही. ओबीसी समाजाचं आरक्षण धोक्यात आल्यावर गळ्यात कोणतीही फुलाची माळ गळ्यात घालणार नाही, असं सांगितलं होतं. आता ओबीसी आरक्षण वाचलं आणि लोकांनी गळ्यात हार घातले,” असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं.
“आपल्याला दुधही पोळलेलं असून ताकही फुंकून पिण्याची वेळ आली आहे. त्यामुळे २०२४ हे वर्ष इतिहास घडवणारं म्हणजेच इतिहास बदलणारं वर्ष आहे. मला माध्यमांनी विचारलं, तुम्ही आमदार, खासदार किंवा ग्रामपंचायत सदस्य नाही. मग काय सर्व पक्ष तुम्हाला ऑफर देतात. त्यावर म्हटलं, ते मला माहिती नाही. पण, मी सर्वसमावेशक चेहरा झालेली आहे,” असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.
“भावनिक मुद्दा करून शेवटी काही साध्य होणार नाही”
मराठा आरक्षणाबाबत पंकजा मुंडे यांनी केलेल्या विधानावर मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “आरक्षणाच्या नावाखाली सरकार आपली जबाबदारी झटकत नाही. आर्थिकदृष्ट्या ज्या माध्यमातून समाजातील मुलांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना शिकवता येईल. हे सर्व प्रयत्न राज्य सरकार करत आहे. आरक्षणासाठीही आपण प्रयत्न करत आहोत. पण, त्यासाठी भावनिक मुद्दा करून शेवटी काही साध्य होणार नाही,” असं राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटलं आहे.