३ जानेवारी २०२०,
मराठी साहित्य कला मंडळ प्रकाशित आणि लोक मंगल ग्रूप शिक्षण संस्था आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या उपसभापती तसेच कवयित्री डॉ नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते कवी राजन लाखे लिखित काव्यफुले असलेल्या साहित्य दिनदर्शिकेचे प्रकाशन पत्रकार भवन पुणे येथे पार पडले.अध्यक्षस्थानी माजी आमदार तसेच व्याख्याते उल्हास पवार तर प्रमुख पाहुणे या नात्याने अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ चे अध्यक्ष मेघराजराजे भोसले होते. त्यावेळी व्यासपीठावर कवी राजन लाखे, डॉ शैलेश गुजर, उद्योजक विजय चौधरी आयोजक शिरीष चिटणीस उपस्थित होते.
डॉ नीलम गोऱ्हे यांनी, साहित्यिकांनी राजकारण्यांना व्यासपीठावर घेण्यासाठी खंत न बाळगता सोबत वाटचाल करावी असे कथन करून साहित्य दिनदर्शिकेत प्रत्येक पानावर असलेल्या आशयपूर्ण चार ओळीचे काव्य, जीवनातील दैनंदिन वाटचाल यशस्वी करणारे आहे असे प्रतिपादन केले.उल्हास पवार यांनी कमी शब्दात मोठा आशय सांगून जाणारी वाक्ये अथवा ओळी नेहमी स्मरणात राहतात आणि ती आयुष्यात महत्वपूर्ण ठरतात म्हणून राजन लाखे यांची चार ओळींची काव्यफुले आणि त्यानुसार रेखाटलेली चित्रे दिनदर्शिकेच्या रूपाने प्रसिद्ध केल्याने तसेच सदर प्रयोग हा आगळावेगळा असल्याने अशा प्रकारची साहित्य दिनदर्शिका समाजासाठी उपयुक्त ठरेल अशी आशा व्यक्त केली. यावेळी राजन लाखे, मेघराजराजे भोसले, शैलेंद्र गुजर, विजय चौधरी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
साहित्य दिनदर्शिकेतील प्रत्येक महिन्याच्या पानावर असलेल्या काव्यफुलांसाठी नेमलेल्या निवडसमितीचे सदस्य प्रकाश पायगुडे, मच्छिंद्र धुमाळ, क्षितिज पाटुकले, सागर बालवडकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.लोकमंगलचे शिरीष चिटणीस यांनी प्रास्ताविक केले. प्रसिद्ध गायिका रिचा राजन हिच्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरवात व पसायदान ने सांगता झाली तर वि.दा. पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले.