२३ जानेवारी २०२०,
छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी प्रशासनाचं प्रतिनिधित्व करणारी ही राजमुद्रा रयतेच्या राज्याचे सार्वभौमत्व सिद्ध करणारी आहे. राजकीय पक्षानं तिचा वापर करणं चुकीचं आहे. त्यामुळं शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असून, मनसेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे. तसं निवेदन पोलीस ठाण्यात दिलं आहे.
मुंबईत मनसेचे राज्यव्यापी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात राज ठाकरे यांनी पक्षाच्या नवीन झेंड्याचं अनावरण केलं. हा झेंडा भगव्या रंगाचा असून, त्यावर राजमुद्रा आहे. त्याच्याखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना असं लिहिण्यात आलं आहे. मात्र, मनसेच्या झेंड्यावर राजमुद्रा छापण्याला संभाजी ब्रिगेडनं विरोध केला आहे. त्यांनी मनसेविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. स्वारगेट पोलीस ठाण्यात संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी मनसेविरोधात तक्रार केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा ही प्रशासकीय मुद्रा असून, त्यानुसारच शिवरायांनी रयतेचं राज्य निर्माण केलं. शिवरायांच्या लोककल्याणकारी प्रशासनाचं प्रतिनिधीत्व करणारी राजमुद्रा ही रयतेच्या राज्याचे सार्वभौमत्व सिद्ध करणारी आहे. तिचा वापर कोणत्याही राजकीय पक्षानं करणं चुकीचं आहे, असं संभाजी ब्रिगेडनं म्हटलं आहे. प्रांत, भाषा, जात आणि धर्म यावर आधारित राजकारण करणाऱ्या मनसे आणि राज ठाकरे यांना राजमुद्रेचा वापर करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. मनसेच्या या कृतीमुळं शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळं मनसेविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही संभाजी ब्रिगेडनं केली आहे. राजमुद्रेचा गैरवापर केल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा संभाजी ब्रिगेड स्टाइलनं आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.