Monday, December 4, 2023
Homeताजी बातमीसर्वोच्च न्यायालयाचा निकाल बुचकाळ्यात टाकणारा - राज ठाकरे

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बुचकाळ्यात टाकणारा – राज ठाकरे

गेली वर्षभर सुरु असलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर माननीय सर्वोच्च न्यायालयाने काल अतिशय संतुलित निकाल दिला. सत्तास्थापनेच्या सगळ्या प्रक्रियेला अवैध ठरवताना सरकारला कोणताही धोका निर्माण होणार नाही, असा न्यायनिवाडा सर्वोच्च न्यायालयाने केला. अनेकांना या निर्णयाचं आश्चर्य वाटलं. मनसे प्रमुख राज ठाकरे यांचीही काहीशी तीच गत झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बुचकाळ्यात टाकणारा आहे, असं सांगताना नाही नाही म्हणता म्हणता राज ठाकरे यांनी बरीच बॅटिंग केली. ते मीरा भायंदर येथे बोलत होते.

राज ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर मिश्किलपणे भाष्य केलं. माझ्यावर अनेक केसेस सुरु आहेत. ज्यावेळी मला न्यायालय किंवा पोलीस एखादी नोटीस बजावतात, त्यावेळी त्यातली भाषा इतकी क्लिष्ट असते की नेमकं आपल्याला अटक केलीये की सोडलंय तेच कळत नाही, असं सांगताना कालचा न्यायालयाचा निर्णय देखील तशाच पद्धतीचा होता, असं राज मिश्किलपणे म्हणाले.

कोण बरोबर-कोण चुकलं?

न्यायालयाने सांगितलं की सरकार स्थापनेची सगळी प्रोसेस चुकली पण तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यायला नको होता. विधिमंडळातल्या गटाला पक्ष म्हणून मान्यता मिळणार नाही. जो राजकीय पक्ष आहे तोच पक्ष म्हणून समला जाईल, फुटलेल्या गटाने पक्षावर दावा सांगू नये, असं न्यायालयाने म्हटलं. मग निवडणूक आयोगाने दिलेला पक्ष आणि पक्षचिन्ह्याच्या निर्णायाचं नेमकं काय होणार, हे पण मोठं कन्फ्यूजिंग करणारं आहे.

एका मुलाखतीत तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जपून राहण्याचा सल्ला दिला होता. आता कोर्टाने १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांकडे सोपवला आहे, त्यावर बोलताना राज ठाकरे यांनी फटकेबाजी केली. ते म्हणाले, कोणत्याही मुख्यमंत्र्याने नेहमी जपूनच राहिलं पाहिजे. आधीचे मुख्यमंत्री जपून राहिले नाही म्हणून तर हे सगळं उभं राहिलं. आपण कोणत्या पदावर बसलेलो आहोत, हे लक्षात घेऊन जपून राहायलाच हवं, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments