१ जानेवारीं २०२०,
आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि शिवांजली सखी मंचच्या पुढाकाराने भोसरी विधानसभा मतदार संघाअंतर्गत ‘इंद्रायणी थडी’ जत्रेचे नियोजन करण्यात आले आहे. ‘महिला सक्षमीकरण’ साठी हक्काचे व्यासपीठ निर्माण करण्याचा संकल्प यानिमित्ताने करण्यात आला आहे. या जत्रेच्या माध्यमातून कला, क्रीडा, उद्योजकता यांसह महिला सक्षमीकरणाचा जागर करण्यात येणार आहे. ‘महिला सुरक्षा आणि सन्मान’ अशी जत्रेची थीम आहे.या नवीन वर्षात म्हणजे ३० व ३१ जानेवारी आणि १ व २ फेब्रुवारी २०२० अशी चार दिवस सकाळी १० ते रात्री १० ही जत्रा कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहा शेजारील गावजत्रा मैदानावर सुरू राहणार आहे, अशी माहिती शिवांजली सखी मंचच्या साक्षी पूजा महेश लांडगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
जत्रेच्या नियोजनात आमदार लांडगे यांच्या सौभाग्यवती पूजा लांडगे आणि कन्या साक्षी लांडगे यांनी पुढाकार घेतला आहे. त्याद्वारे अधिकाधिक महिला बचत गटांना सहभागी करुन घेण्याचे नियोजन केले आहे. इंद्रायणी थडीचे हे दुसरे वर्ष आहे. शिवांजली सखी मंचच्या सर्व सदस्यानी जत्रेची तयारी जोरदार सुरू केली आहे.परिसरातील अधिकाधिक महिला बचत गटांनी जत्रेत सहभागी व्हावे, हा हेतू आहे. स्टॉल बूकिंग आणि वाटपाचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे. अधिक माहितीसाठी शितलबाग, भोसरी येथील आमदार महेश लांडगे यांच्या जनसंपर्क कार्यालयात संजय पटनी (9822217163 ) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. कोणत्याही ब्रँडेड वस्तुंची विक्री करण्यासाठी स्टॉल उपलब्ध होणार नाहीत, असेही संयोजकांनी निश्चित केले आहे.