Thursday, December 12, 2024
Homeउद्योगजगतरेल्वेचा धार्मिक पर्यटनावर भर; पुण्यातून २८ एप्रिलपासून भारत गौरव यात्रा

रेल्वेचा धार्मिक पर्यटनावर भर; पुण्यातून २८ एप्रिलपासून भारत गौरव यात्रा

भारतीय रेल्वेने आता धार्मिक पर्यटनावर भर दिला आहे. धार्मिक पर्यटनासाठी रेल्वेकडून विशेष पर्यटन गाड्या सोडल्या जात आहेत. याचबरोबर धार्मिक यात्रांचे आयोजनही रेल्वेकडून केले जात आहे. रेल्वेने धार्मिक पर्यटनासाठी भारत गौरव यात्रा सुरू केली आहे. या यात्रेची २८ एप्रिलपासून पुण्यात सुरूवात होत आहे.

रेल्वे विभाग २८ एप्रिलला भारत गौरव पर्यटन रेल्वेद्वारे पुरी – गंगासागर दिव्य काशी यात्रा सुरू करणार आहे. ‘देखो अपना देश’ आणि ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ योजनेंतर्गत पुण्यातून ही यात्रा सुरू होत आहे. पुरी, कोलकता, गया, वाराणसी आणि प्रयागराज या महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना या यात्रेदरम्यान भेटी दिल्या जाणार आहेत. ही यात्रा ९ रात्री आणि १० दिवसांची आहे. या यात्रेदरम्यान पर्यटकांना जगन्नाथ मंदिर, कोणार्क मंदिर, लिंगराज मंदिर, काली बारी, विष्णू पद मंदिर, काशी विश्वनाथ मंदिर या धार्मिक स्थळांनाही भेट देता येईल. याचबरोबर भारत गौरव यात्रेंतर्गत महाकालेश्वर- उत्तर भारत देवभूमी यात्रेची सुरूची सुरुवात ११ मेपासून सुरू होत आहे. या यात्रेदरम्यान आग्रा, अमृतसर, हरिद्वार, मथुरा, ऋषिकेश, उज्जैन आणि वैष्णो देवी येथील धार्मिक स्थळांना भेट देता येणार आहे. ही यात्रा ९ रात्री आणि १० दिवसांची आहे.

धार्मिक वारसा दाखवण्याचा हेतू
केंद्र सरकारने ‘देखो अपना देश’ आणि ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या संकल्पनांना चालना देण्याच्या उद्देशाने ही यात्रा सुरू केली आहे. देशातील अनेक ठिकाणहून अशा धार्मिक पर्यटनासाठी रेल्वे मंत्रालय भारत गौरव पर्यटक गाड्या चालवत आहे. भारतातील समृद्ध सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा देशांतर्गत पर्यटकांना तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांना दाखवण्याचा हेतू यामागे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments