३ एप्रिल २०२१,
राज्यात करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळं या संसर्गाला आळा घालण्यासाठी येत्या एक- दोन दिवसांत कठोर निर्बंधांची घोषणा केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर पुन्हा लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनन्स रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात लोक गर्दी करत असल्याचं चित्र आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल केलेल्या आवाहनानंतर दादर भाजी मार्केटमध्ये व अन्य बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचं चित्र आहे. लॉकडाऊनच्या भीतीमुळं लोक खरेदीसाठी बाहेर पडल्याचं बोललं जातंय. तसंच, शनिवार- रविवार जोडून सुट्टी असल्यानंही गर्दी झाली असल्याचं सांगण्यात येतंय.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनचे संकेत दिल्यानंतर लोकमान्य टिळक टर्मिनन्स स्थानकात शनिवारी प्रवाशांची गर्दी उसळली होती. प्रवाशी सुटकेस व प्रवासी बॅगा घेऊन मोठ्या प्रमाणात स्थानकांत जमले होते. युपी- बिहारला जाण्यासाठी मजुर निघाले असल्याची चर्चा आहे. तर, एकीकडे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये दरवर्षी परप्रांतीय मजुर गावाकडे जातो त्यामुळं ही स्थानकांत गर्दी झाल्याची शक्यता आहे.