Saturday, March 22, 2025
Homeताजी बातमीपिंपरी चिंचवड शहरातील रेल्वे प्रवाशांना मिळणार दर्जेदार सुविधा

पिंपरी चिंचवड शहरातील रेल्वे प्रवाशांना मिळणार दर्जेदार सुविधा

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशभरातील ५०८ रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास करण्याचे जाहीर केले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ४४ रेल्वे स्टेशनसह आकुर्डी रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास करण्यात येणार आहे अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर जिल्हा भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शनिवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत यावेळी आमदार उमाताई खापरे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे, भाजपा शहर सरचिटणीस राजू दुर्गे, माजी गटनेते नामदेव ढाके, प्रदेश युवा मोर्चा सचिव अजित कुलथे, भाजपा युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस अनुप मोरे आदी उपस्थित होते.

यावेळी शंकर जगताप यांनी सांगितले की, “आझादी का अमृत महोत्सव” देशभर साजरा केला जात असून देशाला विकासाची नवी दिशा देण्याचा संकल्प करण्यात आला. ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेअंतर्गत आकुर्डी रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमामध्ये केंद्र सरकारने वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित केले. या निमित्त पिंपरी चिंचवड भारतीय जनता पक्षाच्या वतीने ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान शहरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये “हर घर तिरंगा” आणि “मेरी मिट्टी मेरा देश” हे अभियान प्रभावीपणे पिंपरी चिंचवड शहरात राबविण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक प्रभागात असणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या सन्मानार्थ एक फलक लावण्यात येणार आहे. तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. १४ ऑगस्ट रोजी देशाच्या फाळणीच्या काळात ज्यांनी प्राण गमावले त्या सर्वांना श्रद्धांजली वाहीली जाईल.

आमदार उमा खापरे म्हणाल्या, ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेअंतर्गत समाविष्ट रेल्वे स्थानकात रेल्वे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सोयी सुविधा मिळणार आहेत. या योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड शहरातील आकुर्डी रेल्वे स्टेशनचा समावेश करण्यात आला याचा आनंद आहे. या योजनेद्वारे आकुर्डी रेल्वे स्टेशनचा विकास होईल. विकास कामांसाठी सुमारे ३३.८३ कोटींचा निधी केंद्राने मंजूर केला आहे. प्रवाशांना उच्च दर्जाच्या सोयी-सुविधा मिळतील. रविवारी सकाळी ११ वाजता आकुर्डी रेल्वे स्थानकात विकास कामांचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन पद्धतीने करतील. या कार्यक्रमास भाजपा पदाधिकारी, आमदार, कार्यकर्ते, नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन खापरे यांनी केले.

सदाशिव खाडे म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरातील आकुर्डी रेल्वे स्थानकाचा अमृत भारत योजनेंतर्गत समावेश केल्याबद्दल रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, राज्य मंत्री रावसाहेब दानवे, मंत्री दर्शना जरदोश यांचे शहरवासीयांच्या वतीने आभार मानतो.

आकुर्डी रेल्वे स्थानकात प्रवेशासाठी दोन प्रवेशव्दार, दुचाकी, चार चाकी वाहनांसाठी प्रशस्त वाहनतळ, प्रवासी नागरिकांसाठी प्रतिक्षा कक्ष, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी कक्ष बांधणी, फलाटावर जाण्या – येण्यासाठी सरकते जिने, प्रसाधनगृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रेल्वे स्थानकाच्या परिसराचे सुशोभीकरण आदी विकास कामे करण्यात येणार आहेत असे खाडे यांनी सांगितले.

भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत अनेक कार्यक्रम घेतले जातील. पिंपरी चिंचवड शहरात ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ हे अभियान राबविण्यात येईल. यामध्ये सर्व सामान्य नागरिकांना सहभागी केले जाईल, असे नामदेव ढाके यांनी सांगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘मेरी मिट्टी मेरा देश’ कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यामध्ये शहरातील प्रत्येक भागातील स्वातंत्र्य सैनिक, केंद्र व राज्य शासनाच्या सेवेतील पोलीस, अधिकारी यांच्या सन्मानार्थ मूक मिरवणूक काढण्यात येईल. प्रत्येक मंडलातील शाळा, महाविद्यालयात स्वातंत्र्य संग्रामातील व फाळणीच्या कटू आठवणींचे प्रदर्शन आयोजित केले जाईल असे, अनुप मोरे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments