रेल्वे प्रवाशांना आता प्रवासादरम्यान रात्रीच्या वेळी मोबाईल-लॅपटॉप चार्ज करता येणार नाही. रात्रीच्या वेळी लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमधील मोबाईल, लॅपटॉप चार्जिंगसाठीचा वीज पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. लांब पल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांमध्ये लागणाऱ्या आगीच्या घटना रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने रात्रीच्या वेळी इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या चार्जिंग पोर्टचा वीज पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या निर्णयाची माहिती दिली.
या निर्णयानुसार, रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत रेल्वेतील इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या चार्जिंग पोर्टचा वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे रात्रीच्या प्रवासाला निघण्यापूर्वी प्रवाशांना मोबाईल, लॅपटॉप पूर्ण चार्जिंग करून निघावे लागणार आहे. रेल्वेच्या पश्चिम विभागाने या निर्णयाची 16 मार्चपासून अंमलबजावणीही सुरू केली आहे.
“नुकत्याच झालेल्या आगीच्या घटना लक्षात घेऊन आवश्यक निर्णय घेण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून यापूर्वीही रेल्वे बोर्डाने असे आदेश जारी केले होते. मुख्य स्विचबोर्डवरुन रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत चार्जिंग पॉईंट्सची वीज बंद ठेवली जाईल”, असे रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले.