Sunday, December 3, 2023
Homeताजी बातमीराहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल.. ! वक्तव्य चर्चेत

राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल.. ! वक्तव्य चर्चेत

लोकसभेची खासदारकी परत मिळाल्यानंतर राहुल गांधींनी बुधवारी केलेल्या पहिल्याच भाषणात मोदी सरकारवर हल्लाबोल केला. मणिपूरच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी नरेंद्र मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. या प्रस्तावावर सध्या दोन्ही बाजूच्या सदस्यांकडून भाषणं चालू असून गुरुवारी १० ऑगस्ट रोजी त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देणार असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर आज राहुल गांधींनी केलेल्या भाषणात मोदी सरकारवर परखड शब्दांत टीका करण्यात आली. “मोदी सरकारने मणिपूरमध्ये हिंदुस्थानची हत्या केली”, असं राहुल गांधी आपल्या भाषणात म्हणाले.

“मोदींसाठी मणिपूर हिंदुस्थान नाही”

“काही दिवसांपूर्वी मी मणिपूरला गेलो. आमचे पंतप्रधान आजपर्यंत गेले नाहीत. कारण त्यांच्यासाठी मणिपूर हिंदुस्थान नाही. मी मणिपूर शब्दाचा वापर केला. पण आज मणिपूर वाचलेलं नाही. मणिपूरला तुम्ही दोन भागांमध्ये वाटलं आहे. मी मणिपूरच्या रिलीफ कॅम्पमध्ये गेलो. तिथे महिलांशी बोललो. मुलांशी बोललो. जे आपल्या पंतप्रधानांनी आजपर्यंत केलं नाही. एका महिलेला मी विचारलं, तुमच्याबरोबर काय झालं? तर एक महिला म्हणाली, माझ्या डोळ्यांसमोर माझ्या मुलाला गोळी मारली गेली. मी रात्रभर त्याच्या प्रेताबरोबर झोपले होते”, असं राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधींच्या या विधानावर सत्ताधारी बाकांवरून “हे खोटं आहे”, असं म्हणताच “मी खोटं बोलत नाही, तुम्ही खोटं बोलता” असं म्हणत सत्ताधाऱ्यांना टोला लगावला.

“यांनी मणिपूरमध्य हिंदुस्थानची हत्या केली आहे. यांच्या राजकारणानं मणिपूरला नाही, हिंदुस्थानला मणिपूरमध्ये मारलं आहे. हिंदुस्थानची हत्या केली आहे. यांनी मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या केली. तुम्ही मणिपूरच्या लोकांना मारून हिंदुस्थानची हत्या केली. तुम्ही देशद्रोही आहात. त्यामुळेच तुमचे पंतप्रधान मणिपूरमध्ये जाऊ शकत नाहीत. कारण त्यांनी मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या केली आहे. तुम्ही भारत मातेचे रक्षक नसून भारत मातेचे खूनी आहात”, अशा आक्रमक शब्दांमध्ये राहुल गांधींनी हल्लाबोल केला.

“आपलं सैन्य मणिपूरमध्ये एका दिवसात शांतता प्रस्थापित करेल”

“मी मणिपूरमध्ये माझ्या आईच्या हत्येविषयी बोलतोय. आदरानंच बोलतोय मी. माझी एक आई इथे बसली आहे, दुसऱ्या आईला तुम्ही मणिपूरमध्ये मारलं आहे. जोपर्यंत तुम्ही हिंसाचार थांबवत नाही, तोपर्यंत तुम्ही माझ्या आईची हत्या करत आहात. भारताचं सैन्य मणिपूरमध्ये एका दिवसात शांतता प्रस्थापित करू शकते. पण तुम्ही सैन्याचा वापर करत नाही आहात. कारण तुम्हाला हिंदुस्थानला मणिपूरमध्ये मारायचं आहे”, असंही राहुल गांधी आपल्या भाषणात म्हणाले.

“मोदी हिंदुस्थानच्या हृदयाचं ऐकत नाहीत, तर इतर दोन व्यक्तींचं ऐकतात. रावण दोन लोकांचं ऐकायचा. मेघनाथ आणि कुंभकर्ण. तसंच नरेंद्र मोदी दोन लोकांचं ऐकतात. अमित शाह आणि अदाणी. लंकेला हनुमानानं जाळलं नव्हतं. लंकेला रावणाच्या अहंकारानं जाळलं होतं. रामानं रावणाला नव्हतं मारलं. रावणाच्या अहंकारानं त्याला मारलं होतं. तुम्ही पूर्ण देशात केरोसिन फेकत आहात. मणिपूर, हरियाणात तुम्ही तेच करत आहात. पूर्ण देशाला तुम्ही जाळायला निघाला आहात. तुम्ही पूर्ण देशात भारत मातेची हत्या करत आहात”, असंही राहुल गाधी म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments