देशभरात पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. दरात सतत होणाऱ्या दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. आज(दि.३) पुण्यात महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अलका चौकामध्ये आंदोलन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला चपलांचा हार घालून मोदींच्या फोटोची आरती करत निषेध व्यक्त केला. तसेच, आंदोलनाची दखल न घेतल्यास पुढच्यावेळी आणखी तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही देण्यात आला.
“केंद्र सरकारमार्फत मागील महिन्याभरात गॅसच्या दारात सव्वाशे रुपये वाढ झाली आहे. तर दररोज पेट्रोल डिझेलमध्ये वाढ करून हा दर देखील 100 रुपयांपार गेलाय. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचं जगणं कठीण झालं आहे. त्यामुळे आम्ही आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोस चपलांचा हार आणि आरती करून निषेध व्यक्त केला”, अशी माहिती यावेळी पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सोनाली मारणे यांनी दिली. भविष्यात आणखी तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही त्यांनी दिला.