पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर माध्यमांशी बोलताना ‘शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्याला सर्वोच्च प्राधान्य असेल,’ असे नमूद केले होते. त्यानंतर दोनच दिवसांत विद्यापीठात हा प्रकार घडला. विद्यापीठातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आली असताना, तेथे बंदोबस्तासाठी नेमलेल्या उपनिरीक्षकाने आवश्यक पावले उचलली नाहीत, असा ठपका संबंधितावर ठेवण्यात आला आहे. पूर्व प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी कारवाईचा आदेश दिला.
भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राची तोडफोड करीत असताना त्या ठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या पोलिस उपनिरीक्षकाने ही बाब नियंत्रण कक्ष किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना न कळवता; तसेच आवश्यक उपाययोजनाही न केल्याने संबंधित उपनिरीक्षकाला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. सचिन शंकर गाडेकर (चतु:शृंगी पोलिस ठाणे) असे निलंबित उपनिरीक्षकाचे नाव आहे.
उपनिरीक्षकावर आरोप काय… ?
ललित कला केंद्र या ठिकाणी उपनिरीक्षक सचिन गाडेकर यांची बंदोबस्तासाठी नेमणूक केली होती. त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला असतानादेखील गाडेकर यांनी योग्य ती दखल घेतली नाही. त्यांनी घटनास्थळी शीघ्र कृती दलाला बोलावले नाही; तसेच पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक, सहायक आयुक्त आणि विभागाच्या उपायुक्तांसह पोलिस नियंत्रण कक्षालाही घडलेला प्रकार कळवला नाही. त्यामुळे वरिष्ठांना घटनेची वेळीच माहिती मिळाली नाही. जबाबदार पोलिस अधिकारी म्हणून कार्यरत असताना सरकारी सेवेत सचोटी व कर्तव्यपरायणता राखणे आवश्यक आहे. असे असतानाही गंभीर स्वरूपाच्या हलगर्जीपणामुळे पोलिस दलाची प्रतिमा जनमानसात मलीन झाल्याचा ठपका गाडेकर यांच्यावर ठेवण्यात आला आहे.