पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर वनमंत्री संजय राठोड यांनी रविवारी राजीनामा दिला. याच प्रकरणाच्या तपासासंदर्भात आज पुण्यात आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. मात्र प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी गुप्ता आपल्या खुर्चीवरुन उठून हसत हसत हॉलबाहेर गेले.
पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी पूजा चव्हाण प्रकरणी प्रश्न विचारले. संशयित मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे का?, पोस्ट मार्टम अहवाल नेमका काय आले आहे, यासारख्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी गुप्ता हे हसतच आपल्या जागेवरुन उठले आणि हॉलबाहेर पडले. पूजा चव्हाण तपासासंदर्भातील कोणत्याही प्रश्नाचं उत्तर न देता पुण्याचे पोलीस आयुक्त पत्रकार परिषद सोडून निघून गेले. पत्रकारांच्या प्रश्नांकडे साफ दुर्लक्ष करत गुप्ता यांनी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेल्या हॉलमधून काढता पाय घेतला.
मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी पूजा चव्हाण यांची चुलत आजी शांताबाई राठोड यांच्यासह भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांचं वानवडी पोलिस स्टेशन बाहेर रविवारी ठिय्या आंदोलन केलं होतं.