पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिका समन्वयाने राबवत असलेल्या नदी सुधार प्रकल्पाबाबत उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या प्रकल्पात मुळा-मुठा, पवना व इंद्रायणी नद्यांवरील पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्या, नदी स्वच्छता, पूरस्थिती नियंत्रण, तसेच जलप्रवाहातील अडथळे दूर करण्यावर भर देण्यात आला.
बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्देश दिले की, बदलते हवामान, वाढते नागरीकरण आणि पूरस्थिती लक्षात घेऊन प्रकल्प राबवला जावा. जैवविविधता, पर्यावरणीय समतोल आणि नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून दोन्ही महापालिकांनी समन्वय राखावा, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीस विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांचे आयुक्त, पीएमआरडीए, जलसंपदा विभाग, सीडब्ल्यूपीआरएस यांसह संबंधित शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संगणकीय सादरीकरणाद्वारे प्रकल्पाचा आराखडा मांडण्यात आला.
याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या प्रतिनिधींशीही बैठक घेतली. कुदळवाडी व चिखली परिसरातील औद्योगिक पार्क, लघुउद्योजकांवरील एलबीटी नोटिसा रद्द करणे, रस्ते व भुयारी गटार योजना, औद्योगिक परिसरातील वीजपुरवठ्यासाठी नवीन सबस्टेशन, अनधिकृत झोपडपट्टी व भंगार दुकाने बंद करणे अशा मुद्द्यांवर चर्चा झाली.
लघुउद्योजकांच्या सोयीसाठी महावितरण, महापालिका, एमआयडीसी व प्रदूषण नियंत्रण मंडळाने एकत्रितपणे काम करावे, अशा सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या.


